सोलापूर : रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त अन्नपूर्णा फाउंडेशन, सोलापूर संचालित जय हिंद फूड बँकेच्या वतीने सोलापूर कारागृहातील कैदी बांधवांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.
यावेळी जय हिंद फूड बँकेच्या महिला सदस्यांनी कारागृहातील कैदी बांधवांच्या मनगटावर प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाचे प्रतीक असलेली राखी बांधली. या उपक्रमातून समाजातील प्रत्येक व्यक्तीला प्रेम, माणुसकी आणि सन्मान मिळावा, तसेच “माणुसकीच्या नात्याला भिंती नसतात” हा संदेश देण्यात आला.
कारागृहातील कैदी बांधवांशी संवाद साधत त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. काही काळासाठी का होईना, पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आपलेपणाचे हास्य फुलविण्याचा प्रयत्न जय हिंद फूड बँकेच्या माध्यमातून करण्यात आला.
“राखी हा केवळ धागा नाही, तर विश्वास, प्रेम आणि माणुसकीचे नाते जोडणारा बंध आहे. समाजापासून दूर असलेल्या बांधवांपर्यंतही हा प्रेमाचा धागा पोहोचविणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे,” अशी भावना यावेळी जय हिंद फूड बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
जय हिंद फूड बँकेच्या वतीने सातत्याने “भूक मुक्त भारत” या चळवळीबरोबरच विविध सामाजिक आणि मानवतावादी उपक्रम राबविले जात असून, समाजातील वंचित व गरजू घटकांना आधार देण्याचे कार्य सुरू आहे.
या उपक्रमास कारागृह अधीक्षक श्री कुंभार सर, श्री खेलबुटे सर व कारागृह प्रशासनाचे सहकार्य लाभले. जय हिंद फूड बँकेचे संस्थापक सतिश तमशेट्टी संस्थेच्या अध्यक्षा प्रा.मनाली म्हेत्रे तमशेट्टी, उपाध्यक्ष प्रथमेश रापोल, प्रतीक्षा काटकर, प्रतिभा तमशेट्टी, शुभम बल्ला, सुधीर तमशेट्टी, व महिला सदस्य व कार्यकर्ते यांची यावेळी उपस्थिती होती.


















