बहिण- भावाचे अतूट नाते समजला जाणारा रक्षाबंधनाचा सण हा केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून समाजातील परस्पर विश्वास, स्नेह, एकता आणि बंधुभाव वाढवणारा आहे असे प्रतिपादन एस. व्ही. सी. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य धनंजय नकाते यांनी केले. प्रशालेत आयोजित केलेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमा पूजनानंतर इयत्ता सातवी तुकडी ‘क’ मधील विद्यार्थिनी वैष्णवी साका हिने रक्षाबंधन दिनाचे महत्त्व विशद केले. तर श्रेया वाडी या विद्यार्थिनीने छोट्या कथेद्वारे भाऊ- बहीण यांच्या पवित्र नात्याविषयी प्रभावी मांडणी केली. प्रशालेतील सहशिक्षिका पूजा स्वामी यांनी ‘अण्णा तंगी’ हे कन्नड गीत आपल्या सुरेल आवाजात सादर करून उपस्थितांची मने जिंकली. स्काऊट -गाईडच्या विद्यार्थिनींनी प्राचार्य धनंजय नकाते, उपप्राचार्य सुहास काटगांव,पर्यवेक्षक केदार पटणे, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना राख्या बांधल्या तर विद्यार्थिनींनी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना रंगीबेरंगी राख्या बांधून एक अनोखा रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. वनसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी स्काऊट- गाईडच्या विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. पूर्वी जालादी या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन तर वृंदा कामूर्ती हिने आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक- प्राध्यापिका,शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यानी परिश्रम घेतले.