८० ते ९० लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
तभा वृत्तसेवा
बार्शी दि ऑगस्ट
बार्शी तालुक्यातील सारोळे ग्रामपंचायतीमध्ये विविध शासकीय योजनांच्या निधीत ८० ते ९० लाख रुपयांचा कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत गावातील महिलांनी सोमवारी (३१ ऑगस्ट) बार्शी पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी करुन दोषींवर गुन्हे दाखल करावेत, तसेच गैरव्यवहाराची रक्कम व्याजासह वसूल करावी, अशी मागणी महिलांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
महिलांनी दिलेल्या निवेदनानुसार, २७ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत महिलांना बोलू दिले नसून दमदाटी करुन ग्रामसभेतून बाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामसभेत घरकुलांबाबत प्रश्न उपस्थित केल्यास मंजूर झालेली १६८ घरकुले रद्द करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोपही महिलांनी केला.
सारोळे ग्रामपंचायतीच्या विविध कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. झोपडपट्टी इंदिरानगर येथील भूमिगत गटार योजनेसाठी नागरिकांकडून पैसे घेतल्याचा, गुंटा जाधव वस्तीवरील पाण्याच्या टाकीचे काम न करताच निधी उचलल्याचा, तसेच जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे ९६ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतील पाइपलाइन व टाकीचे काम अपूर्ण असतानाही निधी खर्च झाल्याचा दावा महिलांनी केला.१ ते ३३ नमुना नोंदवही उपलब्ध नाही व त्याची माहितीही देत नाहीत, पाणीपुरवठा डीपीमध्ये पण भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
याशिवाय गावातील रस्ते, स्वच्छता, दिवाबत्ती, गवत फवारणी आदी किरकोळ कामांमध्ये लाखो रुपयांची बिले काढल्याचा आरोप करण्यात आला. जिल्हा परिषद शाळेचे शाळेकडे जाणारा रस्ताही अत्यंत खराब असून विद्यार्थ्यांना शाळेत जाताना त्रास होत असून भविष्यात दुर्घटनेची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच ग्रामपंचायतीच्या शौचालय व पाण्याच्या सिंटेक्स टाकीसाठी ४९ हजार २५० रुपयांचे बिल काढून निकृष्ट काम केल्याचा दावा महिलांनी केला.
घरकुलासाठी पैसे घेतल्याचा आरोप
घरकुल मंजूर करण्यासाठी ग्रामसेवकाने मंदाकिनी गोवर्धन जाधव यांच्याकडून फोन-पेद्वारे ८ हजार रुपये, तर सुकेशिनी महादेव गोसावी यांच्याकडून ४ हजार रुपये रोख घेतल्याचा आरोप महिलांनी केला.
महिला प्रशिक्षणाच्या नावाखाली एकाही महिलेला कोणतेही प्रशिक्षण न देता एकाच दिवशी ५० हजार ९६० व २६ हजार रुपयांचा निधी काढल्याचा आरोपही करण्यात आला.
निकिता जाधव, पूजा भोसले, सुजाता नकाते, शीतल निचळ, शिवकांता उबाळे, सुमन भोसले, अनुसया सुरवसे, प्रभावती कुऱ्हाडे, मैना कांबळे, स्वप्नाली घाटे, अमृता जाधव व मंदाकिनी जाधव यांच्यासह महिलांनी उपोषणात सहभाग घेतला. चौकशी तातडीने न झाल्यास मोठ्या संख्येने महिला आमरण उपोषणास बसतील, असा इशारा देण्यात आला.
Post Views: 4