अकलूज : स्वतःच्या हक्काचे घर असावे, हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. शासनाच्या घरकुल योजनेचा आधार मिळाल्याने अकलूज नगरपरिषद क्षेत्रातील २१ कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. आज २१ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीची पत्रे वितरित करण्यात आली.
अकलूज नगरपरिषद येथे आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्षा रेश्माताई लालासाहेब अडगळे तसेच गटनेते तथा उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीची पत्रे प्रदान करण्यात आली.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजू आणि पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अकलूज नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील आहे. ‘प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर’ या भावनेतून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
घरकुल मंजुरीचे पत्र हातात मिळाल्याने २१ लाभार्थी कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. शासनाच्या योजनेच्या माध्यमातून स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा निर्माण झाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमास सर्व नगरसेवक, सचिन पाटील, मुख्याधिकारी तसेच अकलूज नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.