सोलापूर- पावसाचे अनिश्चित स्वरूप, घटती पर्जन्यवृष्टी, खालावत चाललेली भूजल पातळी आणि आटत चाललेले जलस्रोत यांमुळे शेती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, पशुधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसमोर गंभीर आव्हाने उभी राहत आहेत. दुष्काळाचे बदलते स्वरूप, त्याचे कृषी व अर्थव्यवस्थेवरील परिणाम, शाश्वत जलव्यवस्थापन आणि दुष्काळ निवारणाच्या प्रभावी उपाययोजनांवर व्यापक विचारमंथन घडवून आणण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे संकुलाच्या वतीने शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यस्तरीय दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे यांनी दिली.
‘दुष्काळ : वास्तव, आव्हाने आणि उपाययोजना’ ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. ही परिषद सामाजिकशास्त्रे संकुलात होणार असून, दुष्काळाच्या समस्येवर शास्त्रीय, तंत्रज्ञानाधारित आणि दीर्घकालीन उपाय शोधण्यावर भर दिला जाणार आहे. या परिषदेचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कर्नल प्रकाश महानवर भूषविणार असून, सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. हिवरे बाजार या आदर्श गावाच्या माध्यमातून जलसंधारण आणि ग्रामविकासाचा यशस्वी आदर्श उभा करणारे पद्मश्री पोपटराव पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, तसेच विद्यापीठाच्या सिनेट व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित राहणार असल्याचे प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी सांगितले.
अनियमित पाऊस, पाण्याचे घटते स्रोत आणि भूजल पातळीतील सातत्यपूर्ण घसरण यांमुळे ग्रामीण भागातील जनजीवन आणि अर्थव्यवस्था मोठ्या संकटाला सामोरी जात आहे. शेतीचा वाढता उत्पादन खर्च, पाण्याची टंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि उत्पन्नातील अनिश्चितता यांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक जीवन अधिक असुरक्षित बनत आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळाकडे केवळ नैसर्गिक आपत्ती म्हणून न पाहता, त्याचे सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि कृषीविषयक पैलू लक्षात घेऊन उपाययोजना आखण्याची गरज आहे. याच उद्देशाने दुष्काळाचे वास्तव व बदलते स्वरूप, दुष्काळ आणि कृषी अर्थव्यवस्था, जलव्यवस्थापन, दुष्काळ निवारणाचे शाश्वत उपाय तसेच दुष्काळाचे अर्थकारण या महत्त्वपूर्ण विषयांवर परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. जलसंधारण, उपलब्ध जलस्रोतांचे प्रभावी व्यवस्थापन, भूजल पुनर्भरण, पाण्याचा काटकसरीने वापर आणि स्थानिक परिस्थितीला अनुरूप उपाययोजना यांसारख्या विषयांवरही तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
याचबरोबर या परिषदेमध्ये ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व कृषी अर्थकारणाचे अभ्यासक प्रा. डॉ. वसंतराव जुगले, जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे डॉ. बाळ राक्षे, अनगर येथील डॉ. स्वाती संतोष थिटे, ज्येष्ठ जलतज्ज्ञ व जलव्यवस्थापन अभ्यासक प्रदीप पुरंदरे, प्रगतशील शेतकरी विश्वासराव कचरे (सोलापूर) आणि बालाजी लोहकरे (बेगमपूर, सोलापूर) हे मान्यवर सहभागी होणार आहेत.
*शासनाला सादर होणार दुष्काळ निवारणाचा कृतीशील अहवाल*
या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे चर्चा केवळ शैक्षणिक किंवा सैद्धांतिक पातळीवर मर्यादित न ठेवता त्यातून प्रत्यक्ष अंमलबजावणी योग्य उपाययोजना पुढे आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परिषदेत झालेल्या विचारमंथनाच्या आधारे दुष्काळ निवारणासाठी सर्वसमावेशक निष्कर्ष अहवाल तयार करण्यात येणार आहे. यामध्ये तातडीने करावयाच्या उपाययोजनांसह कायमस्वरूपी दुष्काळमुक्तीसाठी आवश्यक असलेल्या दीर्घकालीन धोरणात्मक शिफारशींचा समावेश असेल. हा अहवाल राज्य शासनाकडे अधिकृतपणे सादर करण्यात येणार असून, दुष्काळ निवारणाच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेसाठी तो उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे. दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी शासन, प्रशासन, शैक्षणिक संस्था, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक संस्था आणि शेतकरी यांच्यात समन्वय निर्माण होणे आवश्यक आहे. या परिषदेच्या माध्यमातून ज्ञान, संशोधन आणि प्रत्यक्ष अनुभव यांची सांगड घालून दुष्काळ निवारणासाठी व्यवहार्य उपाय पुढे आणण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.
या राज्यस्तरीय दुष्काळ परिषदेस जिल्ह्यातील पत्रकार, कृषी व ग्रामीण वार्ताहर, प्रगतशील तसेच सर्वसामान्य शेतकरी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी, जलसंवर्धन क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. गौतम कांबळे आणि डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले आहे.
Post Views: 16