बार्शी – यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचे परिणाम आता केवळ शेतकऱ्यांपुरते मर्यादित राहिले नसून सर्वच क्षेत्रांमध्ये जाणवू लागले आहेत. शेती, व्यवसाय आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक व्यवहारांवर याचा परिणाम होत असताना, बार्शीच्या प्रसिद्ध आठवडी बाजारालाही दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत.
बार्शी शहरात दर शनिवारी भरणारा आठवडी बाजार म्हणजे खरेदीदार आणि विक्रेत्यांची मोठी गर्दी असलेले ठिकाण. नेहमीच्या दिवशी या बाजारातून पायी चालत बाहेर पडणेही जिकिरीचे होते. दुचाकी वाहनांना बाजार परिसरातून मार्ग काढणे कठीण होत असे.चारचाकी तर सोडाच. मात्र, शनिवारी बाजाराचे चित्र पूर्णपणे बदललेले पाहायला मिळाले.
नेहमी ग्राहकांच्या गर्दीने गजबजणाऱ्या बाजारपेठेत आज रस्त्यांवर तुरळक नागरिक दिसून येत होते. भाजीपाला, फळे, किराणा तसेच इतर वस्तूंची विक्री करणारे व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसलेले दिसले. ग्राहकांची संख्या घटल्याने अनेक व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट स्पष्टपणे जाणवत होते.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा कमी पडत आहे. शेतीमालाचे उत्पादन आणि उत्पन्नावर परिणाम झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांच्या खरेदी क्षमतेवरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे. त्याचा थेट फटका बाजारपेठेतील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे.
आठवडी बाजारात होणारी गर्दी ही केवळ खरेदी-विक्रीपुरती मर्यादित नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या आर्थिक उलाढालीचेही प्रतीक आहे. मात्र, बाजारातील कमी झालेली गर्दी पाहता दुष्काळाचा परिणाम आता बाजारपेठेपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे.
नेहमी गर्दीने फुलणारा बार्शीचा आठवडी बाजार आज मात्र ग्राहकांच्या प्रतीक्षेत दिसला. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचे पडसाद आता व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही उमटू लागल्याने दुष्काळाची तीव्रता सर्वसामान्यांच्या जीवनात किती खोलवर पोहोचली आहे, याची जाणीव या बाजारातील शुकशुकाटातून होत आहे.