पंढरपूर – येथील अधिक्षक डाक घर कार्यालयात बुधवारी २ सप्टेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती येथील पंढरपूर विभाग डाकघर कार्यालयाचे अधिक्षक मुन्ना कुमार यांनी दिली.
या बाबतची माहिती देताना श्री. कुमार यांनी सांगितले की, देशामधील पोस्टाची सेवा ही सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये अप्रत्यक्षपणे पोस्टाच्या सेवेतून एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करून प्रभावित केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा आणि ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचे प्रयत्न करते. ही सेवा देताना संभाषणामध्ये / पत्रव्यवहारातील सेवेसंदर्भात तक्रार करण्याची वेळ येते. ह्या तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी डाक अदालत घेण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार सोडविण्याचा प्रयत्न करतात.
अधीक्षक डाकघर, पंढरपूर विभाग, पंढरपूर द्वारा २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता अधीक्षक डाकघर कार्यालय, पंढरपूर येथे डाक अदालत आयोजित करीत आहेत.
पोस्टाच्या कार्यपद्धती विषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल आणि समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक आणि मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा उदा. तारीख आणि ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव आणि हुद्दा इत्यादी.
संबंधितांनी डाक सेवेसंबंधी आपली तक्रार अधीक्षक डाकघर, पंढरपूर विभाग, पंढरपूर-४१३३०४ यांचे नावे दोन प्रती सह दिनांक १ सप्टेंबर २०२६ पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही अशी देखील माहिती पंढरपूर डाकघर विभागाचे अधिक्षक मुन्ना कुमार यांनी दिली.
Post Views: 10