सोलापूर : शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा सुधारण्यासाठी महापालिकेने तयार केलेल्या तब्बल १,४९६ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या योजनेच्या पुढील प्रक्रियेला गती मिळणार असून, आता मंजुरीसह निविदा प्रक्रिया दिल्लीमार्गे जागतिक बँकेकडे पाठविण्यात येणार आहे.
महापालिकेने सुरुवातीला १,३७८ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन प्रकल्पात सोलर पॅनल सिस्टिमचा समावेश करण्यात आल्याने प्रकल्पाची किंमत १,४९६ कोटी रुपयांवर गेली. प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी यापूर्वीच मिळाली आहे.
राज्य शासनाच्या हमीवर जागतिक बँकेकडून सुमारे ७५० कोटी रुपयांचे कर्ज मिळण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी जागतिक बँकेच्या निकषांनुसार महापालिकेने उत्पन्नवाढीचे स्रोत आणि इतर आवश्यक प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करून घेतले आहेत.
मुंबईत अपर मुख्य सचिव गोविंदराज यांच्यासमोर प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून शासनाची मंजुरी मिळाली आहे. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, अभियंता उमर बागवान, प्रकल्प सल्लागार जोशी व अधिकारी गेल्या काही दिवसांपासून या प्रकल्पासाठी प्रयत्नशील आहेत. ऑक्टोबरअखेर अथवा नोव्हेंबरच्या प्रारंभी मक्तेदाराला कार्यादेश देण्याच्या दृष्टीने प्रशासनाची धडपड सुरू आहे.
—
Post Views: 17