माढा – माढा तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. माढ्याच्या वेशीपर्यंत पाणी पोहोचले असताना पाटबंधारे विभागाकडून ते थांबविण्यात आल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पाण्यासाठी वारंवार आंदोलने करूनही आश्वासनांपलीकडे ठोस कार्यवाही होत नसल्याने “माढ्याचा पाण्यासाठीचा संघर्ष थांबणार कधी?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
सीना-माढा योजनेचे पाणी माढ्यापर्यंत पोहोचावे, यासाठी गेल्या काही काळात जि प सदस्य आनंद कानडे, शेतकरी व नागरिकांनी अनेक आंदोलने केली. उपोषण, रास्ता रोको तसेच विविध निवेदने देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनांनंतर पाटबंधारे विभागाकडून माढ्याच्या मनकर्णा ओढ्यात पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, वारंवार आश्वासने मिळूनही प्रत्यक्षात अपेक्षित प्रमाणात पाणी माढ्यापर्यंत पोहोचले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी कायम आहे.
पाणी आले, मात्र पुन्हा थांबले!
दरम्यान, माढ्याच्या वेशीपर्यंत पाणी आले असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, पाटबंधारे विभागाकडून अचानक पाणी थांबविण्यात आल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. पाणी सोडले जाणार असल्याच्या आशेने शेतकरी आजही प्रतीक्षेत असताना प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यापूर्वी झालेल्या आंदोलनांवेळीही “पाणी सोडण्यात येईल” अशी आश्वासने देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात पाणी माढ्यापर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे केवळ आश्वासनांची खैरात न करता पाटबंधारे विभागाने प्रत्यक्ष कृती करून माढ्याला पाणी द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
आश्वासनांवर शेतकऱ्यांचा विश्वास उरला नाही
पाण्यासाठी तीन वेळा आंदोलन करण्याची वेळ येऊनही प्रश्न सुटत नसल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. पाणी सोडण्याबाबत अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी माहिती दिली जात असल्याने शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याचा आरोप केला जात आहे.
सीना-माढा योजनेचे पाणी माढ्यापर्यंत पोहोचणे हा केवळ एका गावाचा प्रश्न नसून परिसरातील अनेक गावांच्या शेती आणि पिण्याच्या पाण्याशी संबंधित गंभीर विषय आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून पाण्याचा प्रवाह सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
“आता आश्वासन नको, प्रत्यक्ष माढ्यापर्यंत पाणी हवे,” अशी भूमिका शेतकरी व नागरिकांनी घेतली असून, पाणी माढ्यापर्यंत पोहोचेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे.
Post Views: 16