पंढरपूर – पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील शेतकरी व नागरिकांच्या विविध वीजविषयक प्रश्नांवर आमदार समाधान आवताडे यांनी आक्रमक भूमिका घेतली. पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून त्यांनी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मांडत संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला महावितरणचे वरिष्ठ अधिकारी तसेच विभागीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याच्या समस्यांकडे आमदार आवताडे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना गावठाणाप्रमाणे वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, नवीन डीपी बसविताना त्याची योग्य प्रकारे तपासणी करूनच कार्यान्वित करावा, अशी सूचना केली. फिल्टर युनिटवरून डीपी बसविल्यानंतर त्याला लागू असलेल्या एक वर्षाच्या वारंटी कालावधीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
एनएससी योजनेअंतर्गत घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांना वीज जोडणी उपलब्ध करून देताना शेतकरी व नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांना आवश्यक सेवा विनाशुल्क उपलब्ध करून द्याव्यात, अशी भूमिका आमदार आवताडे यांनी मांडली.
आमदार आवताडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यामुळे मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित मूलभूत प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा निर्माण झाली असून शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
———————
चौकट : ( दररोज सलग आठ तास विज द्यावी )
सध्या शेतीपंपांसाठी अपुरा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पिकांना वेळेवर पाणी देण्यासाठी शेतीपंपांना दररोज आठ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
Post Views: 16