बार्शी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लिओ लायन्स क्लब बार्शी टाऊन यूथ यांच्यावतीने रविवारी ६ सप्टेंबर रोजी श्री भगवंत मंदिर येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत तब्बल १५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शाडू मातीपासून स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या.
या उपक्रमात सुलाखे हायस्कूल व साधना कन्या प्रशाला, बार्शी या दोन्ही शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा मोठ्या संख्येने सहभाग होता. विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शिक्षक दीपक माने, दीपक दुधनकर आणि हरिदास कुंभार यांनी प्रोत्साहन दिले, मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला आणि कलागुणांना मुक्त वाव देत विविध रुपांतील गणेशमूर्ती साकारल्या. काही विद्यार्थ्यांनी लालबागचा राजा, श्री दगडूशेठ गणपती, तर काहींनी शंकराच्या अवतारातील गणेशमूर्ती, मोरावर विराजमान गणपती अशा आगळ्यावेगळ्या संकल्पना शाडू मातीमध्ये साकारल्या. याशिवाय विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतून विविध आकार, मुद्रा आणि रुपांतील गणेशमूर्ती तयार केल्या. त्यामुळे संपूर्ण कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे सुंदर दर्शन घडले.
‘माझ्या हाताने माझा बाप्पा’ या भावनेने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, आनंद पाहायला मिळाला. माती मळण्यापासून गणेशमूर्तीला अंतिम आकार देण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांनी स्वतः अनुभवली. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मूर्तीमध्ये त्याची स्वतंत्र कल्पना आणि कलात्मकता दिसून आली.
या कार्यशाळेत शिल्पकार संजय उपरे व गजेंद्र निकम यांनी विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती तयार करण्याच्या विविध टप्प्यांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. मूर्तीचा आकार, मातीचा योग्य वापर आणि मूर्तीला सुबक स्वरुप देण्याच्या विविध बारकाव्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे हा मुख्य उद्देश लिओ लायन्स क्लब बार्शी टाऊन यूथचे अध्यक्ष पवन श्रीश्रीमाळ म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी आणि गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची सवय लागावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा वापर करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
या उपक्रमासाठी अध्यक्ष लिओ ला. पवन श्रीश्रीमाळ, सचिव ला. उदयन सावंत, खजिनदार ला. गौरव सुराणा, प्रकल्प प्रमुख ला. यश कुंकुलोल, ला. तेजस रायचूरकर, आदित्य सोनिग्रा, गौरव देढिया, राधिका रायचूरकर, रोनक कुंकुलोळ, अनिष श्रीश्रीमाळ, विराग दोशी, शुभम मेहता, पलक कुंकूलोळ आणि गोविंदराज बंडेवार यांनी नियोजन केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी क्लबच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post Views: 15