सोलापूर : स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत सोलापूर शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधायुक्त सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने चार ठिकाणी ‘आकांक्षी शौचालये’ उभारली आहेत. त्यापैकी सात रस्ता येथील नाना-नानी पार्क परिसरात उभारण्यात आलेल्या शौचालयाचे लोकार्पण महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, गटनेते वहीदाबानो शेख, मंडई उद्यान सभापती राजशेखर पाटील, विधी व न्याय समितीचे सभापती सत्यजित वाघमोडे, नगरसेविका श्वेता खरात-खांडेकर, नगरसेविका कल्पना कदम, नगरसेवक प्रा. नरसिंग आसादे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे आदी उपस्थित होते.
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शहरात विविध कामांसाठी येणाऱ्यांची गैरसोय होते. ही अडचण लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने हा उपक्रम राबविला आहे.
शहरातील नाना-नानी पार्क (सात रस्ता), एच.एस.आर. पाणी टाकीजवळ (जुळे सोलापूर), विणकर बाग (कन्ना चौक) आणि एस.टी. स्टँडसमोर क्रोमा शोरूमजवळ अशी चार ठिकाणी ही शौचालये उभारण्यात आली आहेत. दरम्यान, या ठिकाणी बसविण्यात आलेल्या चोरीला गेले आहेत. स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते यांनी यापूर्वी केलेल्या पहाणीमध्ये ही बाब निदर्शनास आली होती. तातडीने या सुविधा येथे उपलब्ध करण्याची गरज वर्तवण्यात आली.
यावेळी महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, शहराचा विकास केवळ रस्ते, पाणी आणि पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधाही सक्षम असणे गरजेचे आहे. स्वच्छ, सुरक्षित आणि चांगल्या दर्जाची सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून देणे हे निरोगी शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. ‘स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवत असून, नागरिकांनीही सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
१० रुपयात शौचालय तर
२० रुपयात आंघोळीची सुविधा
शहरातील प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना सार्वजनिक स्वच्छतागृहाची सुविधा मिळणार आहे.
सात रस्ता येथील नाना-नानी पार्क परिसरात उभारण्यात आलेल्या आकांक्षी शौचालयात १० रुपयात शौचालय तर २० रुपयात आंघोळीची सुविधा उपलब्ध आहे. हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच मुतारीची सोयही करण्यात आली आहे.
Post Views: 25