सोलापूर – झोपलेल्या महानगरपालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आरोग्य मंत्री व पाणीपुरवठा मंत्री यांच्यापर्यंत आक्रोश पोहोचवण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मीनल दास यांच्या नेतृत्वात थाळीनाद आंदोलन चार पुतळा हुतात्मा चौक येथे करण्यात आले.
शहरातील हद्दवाढ भाग, स्वागत नगर, शेळगी परिसर, कुमार स्वामी नगर, नेहरूनगर, स्मृती विहार, सिद्धेश्वर नगर, सोनामाता नगर यांसह शहराच्या विविध भागांत मागील कित्येक वर्षांपासून मध्यरात्री १२ वाजल्यानंतर पाणीपुरवठा केला जात आहे. सोलापूर शहर हे प्रामुख्याने यंत्रमाग कामगारांचे शहर आहे. या भागातील बहुतांश महिला दिवसभर विडी वळण्याचे काम करतात, तर काही महिला नॅपकिन शिवण्याचे कष्टप्रद काम करतात. दिवसभर हातावर पोट असलेल्या या कष्टकरी महिलांना आणि कुटुंबांना रात्री-अपरात्री पाण्यासाठी जागून काढावी लागत आहे. या नियोजनशून्य कारभारामुळे श्रमिक, महिला, वृद्ध आणि लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.
प्रशासनाच्या या ढिम्म कारभारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप होत आहे. जोपर्यंत महापालिका प्रशासन पाणीपुरवठ्याची वेळ बदलून ती दिवसा करत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नसल्याचा इशारा अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सरोजनी माकाई, जयश्री हिरेमठ, जयश्री रानसरसे, अरुणा जाधव, अफ्रीन पटेल, कविता ससाने, सुनिता व्हनकेरी, स्वाती घंटे, योगेश्वरी निंबाळे आदी उपस्थित होते.





















