दि. ८ सप्टेंबर: भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर आणि सोसायटी फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ रिसर्च ऑन पोमोग्रानेट आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे ६ ते ८ सप्टेंबर दरम्यान अमृतकाळासाठी हवामान-सक्षम डाळिंब परिसंस्था : शाश्वतता, नवोन्मेष आणि जागतिक आरोग्याला चालना या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषदेचे आयोजन करण्यात आले.
परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्राचे मा. कृषिमंत्री श्री. दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते झाले. यावेळी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहयोगी महासंचालक (फळे व लागवड पिके) डॉ. व्ही. बी. पटेल, भारतीय कृषी अनुसंधान परिषद – राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव ए. मराठे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. के. ख़र्चे यांच्यासह देश-विदेशातील मान्यवर उपस्थित होते.
उदघाटन प्रसंगी कृषिमंत्री भरणे म्हणाले, महाराष्ट्रातील डाळिंब हे महत्त्वाचे फळपीक असून राज्यात एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र या पिकाखाली आहे. देशातील डाळिंब लागवडीपैकी सुमारे ४३ टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे आणि राज्यातील डाळिंब उत्पादकांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यावेळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी कृषिमंत्री भरणे यांच्याशी संवाद साधून आपल्या अनुभवांसह उत्पादनातील अडचणी मांडल्या. यावेळी सांगोला तालुक्यातील गौडवाडी गावातील डाळिंब शेतकऱ्यांनी उच्य प्रतीच्या निर्यातक्षम डाळिंब उत्पादना मध्ये राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद केले गुरुकृपा शेतकरी गटाची डाळिंब यशोगाथा ऐकून कृषी मंत्र्यांनी केंद्राच्या कामाचे कौतुक केले आणि त्याठिकाणी भेट देण्यासाठी चक्क शेतकऱ्यांकडे वेळ मागितला.
भारतीय डाळिंबासाठी जागतिक बाजारपेठेची दारे अधिक व्यापकपणे खुली करण्यासाठी दर्जेदार उत्पादन, काढणीनंतरचे व्यवस्थापन, शीतगृह व साठवणूक सुविधा, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन यांना चालना देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देतानाच उत्पादनापासून बाजारपेठेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी सक्षम करण्यासाठी संशोधक, शेतकरी, उद्योजक आणि शासन यांच्यात समन्वय वाढविणे गरजेचे असल्याचे कृषिमंत्र्यांनी नमूद केले.
परिषदेत देशभरातील तसेच इटली, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, नेपाळ आणि अमेरिका येथील १३ विदेशी प्रतिनिधींसह ३०० हून अधिक शास्त्रज्ञ, विद्यार्थी, शेतकरी, संशोधक व उद्योग प्रतिनिधींनी सहभाग घेतला. परिषद सुरू होण्यापूर्वी विदेशी प्रतिनिधी व शेतकऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील बाफना फार्म्स, पाटेठाण येथील डाळिंब बागेस भेट देऊन प्रत्यक्ष शेतातील उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती घेतली.
या परिषदेमध्ये भारतीय डाळिंबांसाठी जागतिक बाजारपेठांची दारे खुली करणे या विषयावर ६ सप्टेंबर रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस डाळिंब उत्पादक, निर्यातदार आणि प्रक्रिया उद्योजकांनी मोठा प्रतिसाद दिला. कार्यशाळेत डाळिंब निर्यात, प्रक्रिया उद्योग, जागतिक बाजारपेठेतील संधी, निर्यातीतील अडचणी तसेच डाळिंब उद्योगाच्या भविष्यातील वाटचालीबाबत सविस्तर विचारमंथन करण्यात आले. कार्यशाळेत सहा महत्त्वपूर्ण व्याख्याने झाली. यामध्ये डॉ. सुधांशू, माजी महाव्यवस्थापक यांनी प्रमुख भाषण करताना डाळिंब व प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीची सद्यस्थिती, निर्यात क्षेत्रातील आव्हाने आणि भविष्यातील संधी यावर विशेष भर दिला.
यानंतर श्री. सतीश वराडे, व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांनी अनारनेट, नोंदणी प्रक्रिया आणि डाळिंब निर्यातीमध्ये महाराष्ट्राचे योगदान याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या प्रसंगी देशातील प्रमुख डाळिंब निर्यातदार तसेच उद्योग प्रतिनिधी, त्यामध्ये सॅम ॲग्रीचे श्री. जी. व्ही. के. नायडू, आयएनआय फार्म्सचे श्री. अतुल वाबळे, ग्रो ॲग्रोचे श्री. नरेश गजभिये तसेच इतर उद्योजक उपस्थित होते.
कार्यशाळेदरम्यान उद्योजकांनी डाळिंब निर्यातीतील विविध अडचणी व अपेक्षा मांडताना राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, अपेडा आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या सहकार्यातून तयार करण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या समुद्रमार्गे डाळिंब निर्यातीच्या प्रोटोकॉलच्या निर्मितीबद्दल राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे अभिनंदन केले.
यानंतर सायंकाळी ‘शेतकरी–संशोधक–उद्योजक संवाद’ या विषयावर दुसरी विशेष कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेस महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान अश्या 4 राज्यातून 40 प्रगतिशील डाळिंब उत्पादक शेतकरी तसेच संशोधक, कृषी तज्ज्ञ, उद्योजक, प्रक्रिया उद्योग प्रतिनिधी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यशाळेत बागायती क्षेत्रातील उद्योजकता विकास, गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याचे डाळिंब उत्पादनातील महत्त्व, हवामान-सक्षम डाळिंब बागांची उभारणी, कीड व रोग व्यवस्थापनाच्या आधुनिक पद्धती, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना होणारा लाभ, दुष्काळप्रवण भागातील डाळिंब शेती, शेतकरी उत्पादक संस्थांची भूमिका आणि शाश्वत बागायती विकास या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रगतिशील डाळिंब उत्पादकांनी शेतकऱ्यांचा दृष्टिकोन मांडला. कार्यशाळेत संशोधन, तंत्रज्ञान आणि शेतकरी यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याची तसेच उद्योजकांच्या सहभागातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष शेतापर्यंत प्रसार करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत डाळिंब क्षेत्रातील पाच प्रमुख विषयांवर सखोल चर्चा झाली. यामध्ये डाळिंब आनुवंशिकता, सुधारणा व जैवतंत्रज्ञान; हवामान-सक्षम उत्पादन व संरक्षण; सूक्ष्मजीव समुदाय व जैव-निविष्ठा; काढणीनंतरचे व्यवस्थापन, प्रक्रिया व मूल्यवर्धन; तसेच शेतकरी–संशोधक–उद्योजक संवाद यांचा समावेश होता. विविध देशांतील तज्ज्ञांनी जनुकीय विश्लेषण, रोगमुक्त डाळिंब रोपांची निर्मिती, हवामान-सक्षम उत्पादन, अचूक सिंचन, कृत्रिम बुद्धिमत्ता, जैविक कीड-रोग व्यवस्थापन, काढणीनंतरचे तंत्रज्ञान, मूल्यवर्धन आणि निर्यात याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. व्ही. बी. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारोप समारंभात डॉ. बी. एन. एस. मूर्ती, डॉ. के. बी. पटील, दक्षिण आफ्रिकेच्या डॉ. अँटोइनेट मलान, डॉ. सुभाष भालेकर आणि डॉ. राजीव ए. मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात डॉ. पटेल यांनी रोगमुक्त व गुणवत्तापूर्ण रोपनिर्मिती आणि प्रदेशविशिष्ट वाण व उत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला. तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेत शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर झालेला सहभाग विशेष उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
परिषदेअंती प्रदेशविशिष्ट वाण व उत्पादन पद्धती, हवामान-सक्षम शेती, गुणवत्तापूर्ण आणि निरोगी रोपांची निर्मिती, जैविक निविष्ठांचा वापर, अवशेषमुक्त उत्पादन, अचूक सिंचन, आधुनिक कीड-रोग व्यवस्थापन, काढणीनंतरचे तंत्रज्ञान, मूल्यवर्धन व निर्यातक्षम गुणवत्ता याबाबत महत्त्वपूर्ण शिफारसी करण्यात आल्या.
समारोपप्रसंगी डॉ. राजीव ए. मराठे यांनी गेल्या तीन दिवसांतील परिषदेचा आढावा घेताना बाफना फार्मच्या क्षेत्रभेटीपासून विविध तांत्रिक सत्रांपर्यंत झालेल्या चर्चांचा आढावा घेतला. संशोधन आणि शेतकरी यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. परिषदेच्या माध्यमातून संशोधनातून शेतापर्यंत आणि शेतातून जागतिक बाजारपेठेपर्यंत डाळिंब क्षेत्राला नेण्यासाठी संशोधक, शेतकरी, उद्योग आणि धोरणकर्त्यांमध्ये अधिक दृढ समन्वयाची गरज अधोरेखित झाली. भारतीय डाळिंबाची गुणवत्ता, निर्यातक्षमता, मूल्यवर्धन आणि जागतिक बाजारपेठेतील स्थान अधिक बळकट करण्यासाठी अशा प्रकारच्या संवादातून आणि सहकार्यांतून डाळिंब क्षेत्राला नवी दिशा मिळेल अशी आशा व्यक्त केली.
Post Views: 27