सोलापूर : सिद्धेश्वर पेठेतील सिटी सर्व्हे क्रमांक ६०४३ची सुमारे १० हजार चौरस फूट जागा चितोड रजपूत लोहार समाज संस्थेला सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक उपक्रमांसाठी देण्याच्या प्रस्तावास शुक्रवारी महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत तीव्र विरोध दर्शवण्यात आला. प्रस्तावाला सुरुवातीला मंजुरी देण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले मात्र शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे आणि एमआयएमचे नगरसेवक अजहर हुंडेकरी यांनी आक्षेप घेतल्यानंतर मंजूर करण्यात आलेला हा विषय अखेर तहकूब करण्यात आला.
सोलापूर महापालिका स्थायी समितीची सभा शुक्रवारी सायंकाळी सभापती रंजीता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत एकूण दोन विषय अजेंड्यावर होते. त्यापैकी एका विषयास मान्यता देण्यात आली तर दुसरा विषय वादळी चर्चा आणि विरोधामुळे तहकूब करण्यात आला. चितोड रजपूत लोहार समाज संस्थेला जागा देण्याचा सभासद प्रस्ताव नगरसेवक बिज्जू प्रधाने व भारतसिंग बडूरवाले यांनी मांडला होता. सामाजिक व सार्वजनिक उपक्रमांसाठी जागा देण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना अमोल शिंदे यांनी तीव्र विरोध केला. सुमारे १० हजार चौरस फुटांची महापालिकेची जागा नाममात्र भाड्याने देण्याचा प्रकार योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही जागा कुठे आहे ? किती क्षेत्रफळ आहे ? याची माहिती सभापतींना तरी आहे का असा सवाल अमोल शिंदे यांनी उपस्थित केला.
विशेष म्हणजे, चर्चेदरम्यान संबंधित जागा सुरुवातीला सुमारे दोन हजार चौरस फूट असल्याचे सांगण्यात आले. मात्र, माहिती तपासल्यानंतर जागेचे क्षेत्रफळ सुमारे १० हजार चौरस फूट असल्याचे स्पष्ट झाले. यावरूनही सभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले. महापालिकेच्या मालमत्तेबाबतचे प्रस्ताव आणताना संबंधितांनी वस्तुस्थितीची पूर्ण माहिती घेणे आवश्यक असल्याचे अमोल शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, अमोल शिंदे आणि अजहर हुंडेकरी यांच्या विरोधानंतर मंजूर करण्यात येत असलेला विषय सभापती रंजीता चाकोते यांनी तहकूब ठेवण्याचा निर्णय घेतला.
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवरूनही नाराजी
या बैठकीत सभापती रंजीता चाकोते यांनी महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबतही नाराजी व्यक्त केली. स्थायी समितीच्या बैठकीसाठी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती अपेक्षित असताना काही अधिकारी उशिरा आले तर काही कर्मचारी अनुपस्थित होते. उपस्थित असलेल्या काही अधिकाऱ्यांकडे संबंधित विषयांची पुरेशी माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आचारसंहितेमुळे मागील काळात अनेक कामे रखडली होती. आता विविध कामांना मंजुरी मिळालेली असतानाही प्रत्यक्ष कामे सुरू होत नसल्याबद्दल चाकोते यांनी खंत व्यक्त केली. मंजूर कामांची अंमलबजावणी वेगाने व्हावी आणि अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ड्रेनेज कामाच्या वाढीव खर्चाला मंजुरी
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना २०२४-२५ अंतर्गत प्रभाग क्रमांक ७, निराळे वस्ती-चिंच नगर येथील माटे बगीचा परिसरात ड्रेनेज लाइन टाकण्याच्या कामास स्थायी समितीच्या प्रशासक ठराव क्रमांक ९२, दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार मक्तेदारास वर्क ऑर्डर देण्यात आली आहे.प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी काही भागात मंजूर १८ इंची ड्रेनेज लाइनऐवजी १२ इंची लाइन टाकण्यात आली आहे. जागेवरील परिस्थितीनुसार झालेल्या बदलामुळे कामातील वाढीव व बचत क्वांटिटी तसेच अतिरिक्त बाबींच्या (एक्स्ट्रा आयटम) मान्यतेचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला. या प्रस्तावास समितीने मंजुरी दिली.
गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन : अमोल शिंदे
समाजाच्या नावाचा गोंडस वापर करून महापालिकेची जागा कोणाच्या घशात घालण्याचा प्रयत्न होऊ नये. एका व्यक्तीला जागा देणे आणि त्यासाठी समाजाचे नाव वापरणे आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशारा अमोल शिंदे यांनी दिला. अशा प्रकारचे प्रस्ताव मंजूर होत राहिल्यास महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान होईल. महापालिकेला घरघर लागेल. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही अमोल शिंदे यांनी दिला.
——–
Post Views: 13