पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या आस्थापनेवरील कार्यकारी अधिकारी पदावर मंत्रालयीन अधिकारी श्रीकांत यादव, कक्ष अधिकारी यांची शासनाने प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली असून, त्यांनी नुकताच मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
श्री. यादव यांनी मंत्रालयातील विविध विभागांमध्ये कक्ष अधिकारी म्हणून कामकाज केले असून, ते मूळचे वैराग, ता. बार्शी येथील रहिवासी आहेत. यापूर्वी कार्यकारी अधिकारी पदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी राजेंद्र शेळके यांचा तीन वर्षांचा प्रतिनियुक्ती कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांचा कार्यभार संपुष्टात आला. त्यानंतर शासनाने यादव यांची मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती केली आहे. मंदिर समितीच्या आस्थापनेवर कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक व लेखाधिकारी ही तीन पदे शासन स्तरावरील आहेत.
यादव यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर मंदिर समितीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे स्वागत करण्यासाठी भेटी दिल्या जात आहेत. यावेळी अनेकांकडून हार, पुष्पगुच्छ व सत्काराचे साहित्य आणले जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वागतासाठी हार-तुरे व पुष्पगुच्छ आणण्याऐवजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या अन्नछत्रासाठी तसेच गोशाळेसाठी देणगी स्वरूपात योगदान समक्ष भेटून द्यावे, असे आवाहन केले आहे.
“सत्कारापेक्षा सेवा महत्त्वाची आहे. हार-तुरे व पुष्पगुच्छांवर होणारा खर्च अन्नछत्र किंवा गोशाळेसाठी दिल्यास त्याचा लाभ भाविक, वारकरी तसेच गोमातांच्या सेवेसाठी होईल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यभार स्वीकारल्यानंतर यादव यांनी औपचारिक स्वागत सत्काराला अधिक वेळ न देता मंदिर समितीच्या प्रशासकीय कामकाजाला प्राधान्य दिले आहे. त्यांनी मंदिर समितीच्या विविध विभागांचा दैनंदिन आढावा घेण्यास सुरुवात केली असून, संबंधित विभागांच्या कामकाजाची माहिती, प्रलंबित विषय, उपलब्ध सुविधा तसेच प्रशासनासमोरील विविध बाबींचा आढावा घेतला जात आहे. मंदिर समितीचे प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक, शिस्तबद्ध आणि भाविकाभिमुख पद्धतीने चालविणे, तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, यास प्राधान्य देण्याची भूमिका त्यांच्या कार्यपद्धतीतून दिसून येत आहे.
Post Views: 10