सांगोला – गुणवत्तेसोबत ज्या विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांचे गुण असतात, ते विद्यार्थी खऱ्या अर्थाने गुणवंत असतात. केवळ मार्कलिस्ट विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करत नाही, तर विद्यार्थ्यांमधील संस्कारी भाव त्यांना यशाच्या दिशेने घेऊन जातो. येथील विद्यार्थी केवळ गुणवंत नसून संस्कारक्षम आहेत. संस्थेने घालून दिलेल्या आदर्श तत्त्वांवर त्यांची वाटचाल सुरू आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन ग्रामीण कवी सुनील जवंजाळ यांनी केले. ते शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज, सांगोला येथे गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण समारंभ व शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, जि.प.च्या माजी अध्यक्षा जयमाला गायकवाड, तानाजी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष इंजि.महादेव गायकवाड, सचिव अंकुश गायकवाड तसेच प्राचार्य डॉ.रणजित देशमुख उपस्थित होते. यावेळी कॉलेजच्या ‘सुदर्शन २०२६’ या मॅगझिनचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून माता सरस्वती व भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ.रणजित देशमुख यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील ध्येय व स्वप्ने साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत असे सांगितले. मनोगतात बाबुराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश संपादन करा. अपयशातून धडा घेत नव्या तंत्रज्ञानाची व कौशल्यांची कास धरून जबाबदार नागरिक बना, असा सल्ला दिला. जयमाला गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याचे ध्येय ठेवावे. परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी मेहनत व सातत्याच्या जोरावर आपल्या स्वप्नांना निश्चितपणे आकार देता येतो असे सांगितले. यावेळी शिक्षक दिनानिमित्त श्रेया फेरे, श्रुती काकेकर, सुरेखा लिगाडे, साक्षी शिंदे, ऐश्वर्या यादव, प्रियांका देवकर, अपेक्षा चव्हाण या विद्यार्थिनींनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.डी.बावचे तर आभार प्रदर्शन प्रा.पी. जी.पवार यांनी केले. कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.