सोलापूर – शहरातल्या अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील नक्का कारखान्यात सकाळी कामावर आलेल्या कामगारांना एक साप आढळून आला. कारखान्यात कामाच्या दरम्यान हा साप निदर्शनास आल्याने कामगारांमध्ये काही वेळ खळबळ उडाली होती. कामगारांनी तातडीने प्रसंगावधान राखत कारखान्याचे मालक यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. मालकांनी तातडीने याची दखल घेत सर्पमित्र सुनील अरळीकट्टी यांना फोन करून माहिती दिली. सुनील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर सर्पमित्र सुनील अरळीकट्टी यांनी पाहणी केली असता, तो अतिशय दुर्मिळ असा ‘रुका’ सर्प (Common Bronzeback Tree Snake) या बिनविषारी प्रजातीचा साप असल्याचे निष्पन्न झाले. अरळीकट्टी यांनी अत्यंत शिताफिने आणि सुरक्षितपणे त्या सापाला जेरबंद केले. या सापाची पाठ तांबूस किंवा ब्राँझ (कांस्य) रंगासारखी चकचकीत असते, ज्यावरून त्याला ‘ब्रॉन्झबॅक’ असे नाव पडले आहे. त्याच्या शरीराच्या दोन्ही बाजूंना फिकट पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या आकर्षक पट्ट्या असतात. याचे मोठे डोळे आणि गोलाकार बाहुल्या हे त्याचे मुख्य शारीरिक वैशिष्ट्य आहे. हा साप मध्यम आकाराचा, सडपातळ व लांब असून त्याची शेपटी शरीराच्या तुलनेत बरीच लांब असते, ज्यामुळे त्याला झाडांच्या फांद्यांवर पकड घेणे सोपे जाते.
रुका हा अत्यंत चपळ आणि वेगवान साप मानला जातो. धोक्याची जाणीव होताच तो झाडांच्या फांद्यांवरून किंवा पानांमधून अत्यंत वेगाने पसार होतो. हा प्रामुख्याने झाडे, झुडपे, आणि जंगलात निवास करतो. भारताच्या मुख्य भूभागासह संपूर्ण महाराष्ट्र आणि प्रामुख्याने पश्चिम घाटात सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली आणि कोकण भागात यांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असते. दिवसा शिकार करणाऱ्या या सापाचे मुख्य अन्नसरडे, बेडूक, लहान पक्षी आणि त्यांची अंडी हे असते.
विशेष म्हणजे, हा साप पूर्णपणे बिनविषारी असल्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी तो एका विशेष युक्तीचा वापर करतो. जेव्हा त्याला कुठलाही धोका जाणवतो, तेव्हा तो आपले शरीर फुगवतो. शरीर फुगवल्यामुळे त्याच्या खवल्यांमधील लपलेला आकर्षक निळा रंग उठून दिसतो, ज्यामुळे शत्रू घाबरून लांब पळतो. विशेष बाब म्हणजे, यापूर्वी बरोबर ५ वर्षांपूर्वी याच एमआयडीसी भागातील एका फरशी कारखान्यातून सुनील अरळीकट्टी यांनी याच प्रजातीच्या सापाचे यशस्वी रेस्क्यू केले होते. या सापास तात्काळ त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. औद्योगिक वसाहतीत अशा दुर्मिळ वन्यजीवांचे दर्शन होणे पर्यावरण अभ्यासकांसाठी संशोधनाचा विषय बनला असून, या घटनेमुळे सोलापुरात एकच चर्चा रंगली आहे.
रुका सर्प (Common Bronzeback Tree Snake – Dendrelaphis tristis) ही पश्चिम घाटासह महाराष्ट्रात आढळणारी एक अत्यंत महत्त्वाची बिनविषारी प्रजाती आहे. हा साप निम-वृक्षवासी (Semi-arboreal) असून त्याची शारीरिक रचना झाडांवर आणि झुडपांवर सहज वावरण्यासाठी अनुकूल बनलेली असते. त्याच्या पाठीचा कांस्य (Bronze) रंग आणि छटा त्याला जंगलातील पानांमध्ये नैसर्गिक कॅमफ्लाज प्रदान करतात, ज्यामुळे तो भक्ष्यापासून लपून राहू शकतो. गेल्या पाच वर्षात एमआयडीसी परिसरात 3 वेळा तर अवंती नगर परिसरात एकदा हा साप आढळला असून हा साप त्याच्या मूळ अधिवासातून किंवा परिसरातील झाडांवरून एमआयडीसीमध्ये मालवाहतूक करणाऱ्या किंवा ये-जा करणाऱ्या गाड्यांवर (वाहनांवर) अनवधानाने बसून किंवा लपून या औद्योगिक भागात पोहोचला असावा अशी दाट शक्यता आहे. सर्पमित्र सुनील अरळीकट्टी यांनी योग्य ती तत्परता दाखवत या सापास सुरक्षितपणे रेस्क्यू केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन
*-सर्प अभ्यासक राहुल शिंदे*
Post Views: 23