सोलापूर : गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आणि वृक्षविनायक परिवाराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत सात रस्ता परिसरातील राजीव गांधी इनडोअर स्टेडियम येथे ही कार्यशाळा होणार आहे.या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती तयार करण्याचा अनुभव मिळणार असून, मूर्ती निर्मितीसाठी आवश्यक साहित्य आयोजकांकडून जागेवरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीची पद्धत, त्याचे महत्त्व तसेच गणेशोत्सवातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
वृक्षविनायक परिवार, कृष्णाली सेवा सहकारी संस्था, गणेश युग यांच्यासह शहरातील पर्यावरणपूरक गणेशमूर्तिकार या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ गणेशमूर्ती तयार करण्याचा आनंदच मिळणार नसून, पर्यावरणपूरक मूर्तींचे महत्त्वही समजणार आहे पर्यावरणाची जबाबदारी हा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर वाढावा आणि जलप्रदूषणाला आळा बसावा, यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी सोलापूर महानगरपालिकेसह स्वच्छ वायु सर्वेक्षण विभाग आणि नॅशनल क्लीन एअर प्रोग्रामचे सहकार्य लाभत आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संकल्प करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Post Views: 23