बार्शी – अल्पवयीन मुलीचा मागील काही महिन्यांपासून पाठलाग करुन तिच्याशी प्रेमसंबंधाबाबत बोलणे, तिला एका ठिकाणी बोलावून तिच्या अंगाला स्पर्श करणे, तसेच हा प्रकार घरी सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत एका महिलेने बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेने दिलेल्या जबाबानुसार, त्यांची १२ वर्षे ८ महिने वयाची मुलगी इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे. त्यांच्या घरासमोर आरोपी आपल्या मामाच्या घरी राहतो. मागील दोन-तीन महिन्यांपूर्वी मुलीने आई-वडिलांना आरोपी शाळेत जाताना आपला पाठलाग करुन, ‘तू मला फार आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे,’ असे म्हणत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर मुलीच्या पालकांनी आरोपीच्या
मामाला हा प्रकार सांगितला त्यावेही त्याला समज देण्यात आली.
दरम्यान १० सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता मुलगी शाळेत जात असताना गल्लीतील एका बंगल्याजवळ आरोपीने तिला अडविल्याचा आरोप आहे. त्यावेळी मुलीचे काका तेथे आले असता, आरोपी तेथून पळून गेला. पंधरा दिवसांपूर्वी आरोपीने तिला एका प्लॉटिंग परिसरात बोलावून ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, आपण दोघे इंस्टावर बोलत जाऊ,’ असे म्हणत तिच्या जवळ येऊन अंगाला स्पर्श केला व किस करण्याचा प्रयत्न केला. मुलीने त्याला दूर ढकलून हा प्रकार आई-वडिलांना सांगण्याचे म्हटले असता, घरी सांगितल्यास शाळेत जाताना अडवून मारुन टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर ढोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Post Views: 21