वळसंग – वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वळसंग पोलीस ठाण्यात विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय कवाडे आणि अक्कलकोट विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेंद्र टाकुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. राहुल डोंगरे यांच्या सौजन्याने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत ‘माझे मंडळ – माझी पर्यावरणाची जबाबदारी’ हा मुख्य संकल्प डोळ्यासमोर ठेवून ‘हरित गणेशोत्सव २०२६’ साठी विशेष मार्गदर्शक सूचना व १२ कलमी नियमावली जाहीर करण्यात आली.
बैठकीत जाहीर करण्यात आलेली १२ कलमी नियमावली खालीलप्रमाणे आहे:१. एक मंडळ – २१ झाडे: प्रत्येक गणेश मंडळाने किमान २१ देशी वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करावे.२. ऑक्सिजन पार्क: मंडळांनी ११ दिवसांच्या नव्हे, तर २१ वर्षांच्या दृष्टीने विचार करून स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने ‘मिनी ऑक्सिजन पार्क’ किंवा ‘गणेश वन’ तयार करावे.३. हरितक्रांती: दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक सुवासिनीला किंवा भक्ताला तुळस, आवळा, कडुनिंब, जांभूळ यांसारखी औषधी व देशी रोपे भेट द्यावीत.४. निर्माल्यापासून खत: मंडपात स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवून त्यापासून सेंद्रिय खत तयार करावे आणि त्याचा वापर झाडांसाठी करावा.५. जलप्रदूषणाला प्रतिबंध: कृत्रिम विसर्जन तलावांचा वापर करावा आणि मूर्ती विसर्जनानंतर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी.६. शाडू मातीचे गणपती: पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी शाडूच्या किंवा पर्यावरणपूरक मातीच्या मूर्तींचा वापर करावा आणि नैसर्गिक रंगांना प्राधान्य द्यावे.७. प्लास्टिकमुक्त मंडळ: मंडळ परिसरात सिंगल युज प्लास्टिक, थर्माकोल आणि फ्लेक्स वापरावर पूर्ण बंदी असेल. कापडी किंवा स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा.८. वीज बचत: मंडपात एलईडी दिवे, टाइमर आणि आवश्यक तेवढीच विजेची रोषणाई करून विजेची बचत करावी.९. कचऱ्यापासून कलाकृती: बांबू, कागद, कापड, नारळाच्या करवंट्या यांसारख्या टाकाऊ व नैसर्गिक साहित्यापासून सजावट करावी. ‘बेस्ट इको-फ्रेंडली डेकोरेशन’ पुरस्कार दिला जाईल.१०. पक्ष्यांसाठी पाणपोई: मंडळ परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी आणि धान्यांचे दाणे (दाणा-पाणी) ठेवावेत.११. स्वतःची नर्सरी: मंडळांनी १०० ते ५०० रोपांची छोटी नर्सरी तयार करून गणेशोत्सवानंतरही ही पर्यावरण सेवा सुरू ठेवावी.१२. वाहनमुक्त दर्शन: गणेश भक्तांनी बाप्पाच्या दर्शनासाठी येताना चालत किंवा सायकलने यावे, जेणेकरून प्रदूषण कमी होईल.
हरित गणेश मंडळ स्पर्धा आणि १०० गुणांचे मूल्यमापन:या प्रसंगी वळसंग पोलिसांतर्फे ‘हरित गणेश मंडळ – २०२६’ ही विशेष स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण १०० गुणांचे मूल्यमापन केले जाईल. यामध्ये पर्यावरणपूरक मूर्ती (२० गुण), वृक्षारोपण (२० गुण), निर्माल्य व्यवस्थापन (१५ गुण), प्लास्टिकमुक्त मंडळ (१५ गुण), पर्यावरणपूरक सजावट (१० गुण), पाणी/वीज बचत (५ गुण), सामाजिक पर्यावरण उपक्रम (१० गुण) आणि स्वच्छता (५ गुण) अशा निकषांवर मंडळांना गुण दिले जातील.”बाप्पा आणि निसर्ग दोन्हीही आपलेच आहेत, त्यामुळे ‘स्वच्छ परिसर, हरित महाराष्ट्र, पाणी बचत, प्लास्टिकमुक्त समाज आणि वीज बचत’ या पंचसूत्रीचा वापर करून यंदाचा गणेशोत्सव आदर्श व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा,” असे आवाहन प्रभारी अधिकारी श्री. राहुल डोंगरे यांनी वळसंग परिसरातील सर्व गणेश मंडळांना केले आहे.