बार्शी – सध्या कर्तव्य शुन्य पिढी जन्मास येत असल्यामुळे घरापासूनच प्रामाणिकपणे काम करण्याचे संस्कार करावेत लागतील. समाजात श्रम संस्कार रुजवून आणि कष्टाला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. संजय करंडे यांनी केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने रासेयो वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अब्दुल शेख हे होते.
याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी डॉ. दामाजी भिसे, प्रा. समाधान लोंढे, डॉ. आसावरी फरताडे, डॉ. शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.
पुढे डॉ. करंडे म्हणाले की, रासेयोच्या माध्यमातून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. शिकलेल्या लोकांनी समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महात्मा गांधी म्हणायचे कोणतेही काम हे कमीपणाचे किंवा मोठेपणाचे नसते. लोकांचे दुख समजून घेऊन त्यांचे निराकारण केल्यामुळे महात्मा गांधीसारखे महामानव निर्माण झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. शेख यांनी सांगितले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्दिष्टांची प्राप्तीसाठी स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला पाहिजे, स्वयंपूर्तीने राष्ट्र सेवा केली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दामाजी भिसे यांनी केले. सूत्रसंचलन कु. वेदांती देशमुख व राजनंदिनी मिरगणे यांनी तर आभार प्रा. समाधान लोंढे यांनी मानले.