सोलापूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव-सोलापूर कॅम्पस येथे लाडक्या गणरायाला मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले ते एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे बहारदार लेझीम पथक. पारंपरिक वेशभूषा, शिस्तबद्ध हालचाली आणि लेझीमच्या विविध डावांनी विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले.
दुपारच्या सुमारास गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली. सिंहगडच्या सुमारे ९० एकरांच्या विस्तीर्ण कॅम्पसमधून ही मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा निनाद आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात लेझीम पथकाने ठिकठिकाणी विविध पारंपरिक डाव सादर केले. लेझीमचा ठेका, विद्यार्थ्यांचा जोश आणि शिस्तबद्ध सादरीकरणामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली.
या मिरवणुकीतील आणखी एक लक्षवेधी क्षण म्हणजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी स्वतः विद्यार्थी-विद्यार्थिनींसोबत लेझीम खेळात सहभाग घेतला. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांसोबत लेझीमचा ठेका धरत त्यांचा उत्साह वाढविला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
संपूर्ण कॅम्पसमधून फिरत मिरवणूक सायंकाळी विसर्जनस्थळी पोहोचली. यावेळी सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या हस्ते श्री गणरायाचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळेस प्राचार्य डॉ शंकर नवले, मुख्य प्रबंधक डॉ. डी. आय. नवले, यांच्यासह विविध विभागातील विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. आरती व प्रार्थनेनंतर भक्तिमय वातावरणात कॅम्पसमधील विहिरीत श्री गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक संस्कृतीचे जतन, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विशेषतः लेझीम पथकाच्या बहारदार खेळामुळे यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक संस्मरणीय ठरली.