सोलापूर : सोलापूर शहरातील मोठ्या गृहरचना संस्थांपैकी एक असलेल्या हेरिटेज मणिधारी सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, सोलापूरची द्वितीय वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार,दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता जुना अक्कलकोट रोड येथील पुलगम बँक्वेट हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.या सभेत सर्व विषय एकमताने मंजूर झाले असून ,गेल्या वर्ष भरातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अध्यक्ष व संचालक मंडळाचे सभासदांकडून अभिनंदन करण्यात आले व त्यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
सर्व संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन सभेस सुरुवात करण्यात आली सभेच्या प्रारंभी मृत सभासद व मान्यवरांच्या निधनाने शोक व्यक्त करुन सर्वांनी काही क्षण स्तब्धता पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षा अंजली माशाळकर यांनी प्रास्ताविक भाषणात सर्वांचे स्वागत करुन वर्षभरातील कार्याचा आढावा घेतला.संस्थेचे सचिव सिद्धेश्वर श्रीगादी यांनी सर्व विषयाचे वाचन केले.
त्यानंतर संस्थेच्या मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचन करून त्यास मान्यता देण्यात आली.सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील वार्षिक अहवाल, ताळेबंद,नफा-तोटा पत्रक तसेच लेखापरीक्षण अहवाल याबाबत सभासदांसमोर माहिती ठेवून त्यावर चर्चा करण्यात आली.
सन २०२५-२६ मधील अंदाजपत्रकीय खर्चापेक्षा कमी-जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे,संस्थेच्या नफा वाटणीस मान्यता देणे तसेच आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकावर सभासदांनी चर्चा केली.यावेळी सन २०२६-२७ साठी सभासदांकडून आकारण्यात येणारे मेंटेनन्स व सेवा शुल्क, प्रति युनिट मेंटेनन्स, तसेच विविध प्रकारच्या युनिटनुसार सेवा शुल्क निश्चित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. संस्थेच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी उर्वरित परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व त्यासाठीच्या इस्टिमेटला मंजुरी देण्याबाबतही विचारविनिमय झाला.
ज्या सभासदांनी आपल्या घरात भाडेकरू ठेवले आहेत,त्यांनी संबंधित भाडेकरूंचे पोलीस व्हेरिफिकेशन करून त्याची प्रत संस्थेच्या कार्यालयात जमा करावी,याबाबतही सभेत सूचना करण्यात आली.सोसायटी कार्यालयातील व्यवस्थापक व शिपाई यांच्या नियुक्तीस आणखी एक वर्ष मुदतवाढ देणे तसेच त्यांच्या वेतनवाढीबाबत विचार करण्यात आला.सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्याबाबतही चर्चा झाली.
दरम्यान,असोसिएशन अस्तित्वात असताना गृहरचना संस्थेची स्थापना का करण्यात आली, यासह अन्य मुद्द्यांबाबत काही प्लॉटधारकांनी उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर शहर यांच्याकडे दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संस्थेकडून खुलासा मागविण्यात आल्याची माहिती सभेसमोर ठेवण्यात आली. या विषयावर सभासदांमध्ये सविस्तर चर्चा करून संस्थेच्या वतीने आवश्यक निर्णय घेण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
संस्थेच्या विकासासाठी सभासदांनी मांडलेल्या सूचना,परिसरातील सुविधा,सुरक्षा, व्यवस्था,आर्थिक नियोजन आणि संस्थेच्या पुढील वाटचालीबाबत सकारात्मक चर्चा झाली.सभासदांच्या सहकार्याने संस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.विषयाच्या अनुषंगाने व सभासदांच्या प्रश्नांना ज्येष्ठ संचालक सुधाताई साळुंखे, अविनाश कटारे, अमोघसिद्ध साळुंखे, प्रा.नितीन पतंगे यांनी समर्पक व अभ्यासपूर्ण माहिती व उत्तरे दिली.सभेचे सूत्रसंचालन पत्रकार दशरथ वडतिले यांनी केले.माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, प्रा.भीमाशंकर बिराजदार,गुरुशांत ढंगे व सचिन पतंगे यांनी विविध माहिती देत व प्रश्न विसरुन सभेचे कामकाज पुढे नेले.सभेला संस्थेचे कोषाध्यक्ष काशिनाथ बिराजदार,संचालक सर्वश्री सुरेश येळमेली,शंकर गाडी,बाहुबली वनकुद्रे विलास येमुल, राजकुमार कलशेट्टी,संगीता वड तीले,लक्ष्मी कोटे,स्मिता काळे, प्रेमा ढंगे,सुनीता गोडाळे व व्यवस्थापक दुर्गादास जिंदम आदी तसेच सभासद उपस्थित होते. अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने आयत्यावेळी मांडण्यात येणाऱ्या विषयांवरही चर्चा करण्यात आली.
सभेच्या शेवटी सौ.सुधा साळुंखे यांनी आभार प्रदर्शन केले.सभासदांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे द्वितीय वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाली.
Post Views: 24