जेऊर – करमाळा तालुक्यातील वीट येथील शेतातून चोरीस गेलेला सुमारे ३ लाख ७५ हजार किमतीचा ट्रॅक्टर व त्याला जोडलेला मोगडा करमाळा पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून जप्त केला.या प्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वीट येथील शेतकरी विजयकुमार महादेव गाडे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये लावलेला सोनालिका कंपनीचा साडेतीन लाख रुपयांचा ट्रॅक्टर व पन्नास हजाराचा मोगडा चोरीस गेला होता. याप्रकरणी करमाळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याच्या तपासात दीपक रामदास बरडे व आकाश रामदास बरडे यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी आरोपीकडून संबंधित ट्रॅक्टर व मोगडा हस्तगत केला आहे.पुढील तपास सपोफौ हनुमंत जाधव करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस.व करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने,सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली आहे.
Post Views: 12