बार्शी – किल्लारी येथून भोसरी, पुणे येथे बसने प्रवास करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेचा चालत्या बसमध्ये विनयभंग केल्याची घटना खांडवी (ता. बार्शी) गावाजवळ घडल्याची फिर्याद पोलिसांत दाखल झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शुभम पॉल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिला २८ सप्टेंबर रोजी किल्लारी ते भोसरी असा खासगी बसने प्रवास करीत होती. २९ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास बस खांडवी गावाजवळ आली असता, महिलेच्या सीटच्या पाठीमागील सीटवर बसलेल्या आरोपीने महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, अशा हेतूने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. घटनेनंतर महिलेने आरडाओरडा करून बसमधील कंडक्टर व चालकासह संबंधितांना प्रकाराची माहिती दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी महिलेने संबंधित आरोपीविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोहेकॉ निचळ हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.