माढा – महाराष्ट्रात नुकतेच गणेशोत्सव, व येणाऱ्या नवरात्र उत्सवात ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम गावागावात लोकप्रिय होत असतात, पण माढा तालुक्यातील लोंढेवाडी येथे एक आगळा-वेगळा आणि भन्नाट प्रयोग पाहायला मिळाला.
लोंढेवाडी येथील जय गणेश तरुण मंडळ, दांडेकर पूल यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त गेले आठ-दहा दिवस विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या आग्रहास्तव ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बाबासाहेब लोंढे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात पहिल्यांदाच ‘खेळ धोतराचा आणि विजारीचा’ हा मनोरंजनपर आणि धमाल विनोदी कार्यक्रम सादर करण्यात आला.
या अनोख्या खेळात गावातील धोतर परिधान करणारी आणि विजार घालणारी ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.
या खेळाचे स्वरूप
यामध्ये दोऱ्याला बांधलेली जिलेबी खाणे, सर्वात आधी धोतर नेसून दाखवणे, संगीत खुर्ची, तसेच कपाळावर ठेवलेले बिस्कीट हात न लावता केवळ चेहऱ्याच्या हालचालीने तोंडात आणून खाणे, असे गमतीशीर आणि अफलातून खेळ घेण्यात आले. या खेळांमुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.
या स्पर्धेत लोंढेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक मच्छिंद्र मोरे यांनी प्रथम, अरुण गायकवाड यांनी द्वितीय, तर नागनाथ इंगळे यांनी तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले. विजेत्यांना मानाचे धोतर, टोपी परिधान करून सन्मानित करण्यात आले. गावातील तरुणांनी त्यांना उचलून घेत टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.
या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमासाठी लोंढेवाडीसह पंचक्रोशीतील अबाल-वृद्ध, महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘खेळ पैठणीचा’ प्रमाणेच ‘खेळ धोतराचा’ हा कार्यक्रम देखील येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचावा, अशी अपेक्षा जय गणेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब लोंढे यांनी केले, तर आभार मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मुळूक यांनी मानले.
Post Views: 24