सोलापूर : बँकेतून पैसे आणण्यासाठी दिलेल्या धनादेशद्वारे ७ लाख रुपये काढून घेऊन परस्पर अपहार केल्या प्रकरणी एका मावास भावा विरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागराज रवींद्र पाटील (वय २६ वर्षे, रा. तीर्थ, ता. दक्षिण सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याबाबत काशीनाथ शरणप्पा बिराजदार (वय ४४, रा. हालहाळळी, अक्कलकोट) यांनी फिर्याद दिली आहे.
यातील फिर्यादी काशीनाथ बिराजदार यांनी एक महिन्यापूर्वीच व्यवसाय सुरू केला होता. १ ऑक्टोबर रोजी बी. सी. ॲग्रो, सोलापूर यांच्याकडून त्यांच्या तुरीचे बिल ‘प्रितम गौडा ट्रेडर्स’ या नावाने आले आहे. या बिलाचे ७ लाख रुपये जमा झाले असता, ते पैसे काढून आणण्यासाठी आरोपी नागराज पाटील याच्याकडे चेक दिला होता. मात्र, आरोपी नागराज याने सिद्धेश्वर सहकारी बँक (शाखा मार्केट यार्ड) येथील प्रितम गौडा ट्रेडर्सच्या खात्यावरून ७ लाख रुपये काढले आणि फिर्यादीला न देता ते पैसे घेऊन तो कुठेतरी पळून गेला. आपल्या पैशांचा अपहार करून विश्वासघात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास फौजदार येडे हे करत आहेत.
Post Views: 17