सांगोला – सांगोला तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवार दि.४ ऑक्टोबर रोजी कटफळ (ता.सांगोला) येथे भेट दिली. दुष्काळ मुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करत येथील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी आ.डॉ.बाबासाहेब देशमुख, माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील, माजी आ.शहाजीबापू पाटील, बाळासाहेब एरंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार बाळूताई भागवत, तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव, गट विकास अधिकारी अमोल जाधव, योगेश कांबळे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ना.जयकुमार गोरे यांनी पीक नुकसानीचे पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. तसेच पंचनामे पूर्ण होईपर्यंत नुकसानग्रस्त पिकांवर रोटावेटर फिरवू नये, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. नुकसानग्रस्त एकही पीक पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा, चारा आणि इतर आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राजकारण न करता, शेतकऱ्यांना आवश्यक मदत आणि दिलासा देण्यासाठी शासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी प्रतिक्रिया ना.जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
चौकट-
संकटात बळीराजाला एकटं पडू देणार नाही !
पिकांचे नुकसान झालेल्या एकाही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित राहू देणार नाही. नुकसानग्रस्त प्रत्येक पिकाचा पंचनामा वेळेत आणि योग्य पद्धतीने पूर्ण व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक तसेच संबंधित सर्व यंत्रणांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टांची आणि त्यांच्या संकटाची जाणीव ठेवून, या कठीण काळात शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
-ना.जयकुमार गोरे, पालकमंत्री, सोलापूर जिल्हा
Post Views: 11