सोलापूर : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे २०० रुपयांचे विशेष स्मारक नाणे प्रकाशित करण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.महात्मा फुले यांच्या स्मरणार्थ विशेष पोस्टल तिकिट काढण्याच्या मागणीलाही मंजुरी मिळाली असून संघटनेच्या मागणीला यश आल्याचा दावा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे सोलापूर महानगर अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस शशिकांत कांबळे यांनी केला आहे.
महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीच्या पार्श्वभूमीवर २० मार्च २०२६ रोजी मुंबई मंत्रालयात कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समता परिषदेचे संस्थापक व अध्यक्ष तथा मंत्री छगनराव भुजबळ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन सादर केले होते.महात्मा फुले यांनी जातिभेद, सामाजिक विषमता व अन्यायाविरुद्ध लढा देत महिला, शेतकरी, वंचित व मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या विचारांची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने विशेष नाणे व पोस्टल तिकिट प्रकाशित करण्याची मागणी करण्यात आली होती. मंत्री छगनराव भुजबळ यांनी या मागणीचा केंद्रीय स्तरावर पाठपुरावा केला. त्यानंतर दोन्ही मागण्यांना मंजुरी मिळाल्याचे कांबळे यांनी सांगितले.
—
Post Views: 12