बार्शी – सोलापूर येथील थोर स्वातंत्र्यसेनानी भाई छन्नुसिंह चंदेले यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा २०२६ चा उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार बार्शीचे उद्योजक व उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे सरपंच दिनेशसिंह परदेशी यांना सन्मानपूर्वक मुख्यमंत्र्याचे आर्थिक सल्लागार व सीईओ प्रवीणसिंह परदेशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
दिनेशसिंह परदेशी यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत धाराशिव येथे ९०० सदनिकांची महत्त्वाकांक्षी योजना मुदतीत पूर्ण करुन सर्व ९०० सदनिकांची विक्री केली. महाराष्ट्रातील ९०० सदनिकांची ही मोठी योजना मुदतीत पूर्ण झालेल्या मोजक्या योजनांपैकी एक असून, लाभार्थ्यांना वेळेत घरे उपलब्ध करुन देण्याच्या त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे ३२०० सदनिकांची योजना सध्या सुरु आहे.
सोलापूर येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास सोलापूरचे आमदार देवेंद्र कोठे, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रा. प्रकाश महानवर, सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर देवकर, माजी महापौर नलिनी चंदेले यांच्यासह विविध राजकीय पदाधिकारी, सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक, प्रतिष्ठित उद्योगपती व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिनेशसिंह परदेशी यांनी सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करुन मुख्यमंत्र्याचे आर्थिक सल्लागार व सीईओ प्रवीणसिंह परदेशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यांच्या या सामाजिक योगदानाचे उपस्थितांनी कौतुक केले.
उद्योजकते सोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दिनेशसिंह परदेशी यांच्या कार्याचा या पुरस्काराच्या माध्यमातून गौरव झाल्याने बार्शीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.