बार्शी – विविध उपक्रमांच्या माध्यमातून तालुक्यात अग्रेसर असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ उपळाई (ठों) येथील सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वीचे ६ विद्यार्थी, इयत्ता ४ थीचा १ विद्यार्थी व इयत्ता ७ वीचा १ विद्यार्थी असे एकूण ८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. तसेच सर्वज्ञ सतीश वाघ यांची निवड नवोदयसाठी झालेली आहे.याचबरोबर शाळेची विद्यार्थींनी कु.अन्वी शशिकांत चव्हाण हिची नवोदय विद्यालयसाठी निवड झाली आहे. याचबरोबर शाळेतील ३ विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष श्री. रावसाहेब जाधवर यांनी केला. यावेळी त्यांनी प्रोत्साहनपर विद्यार्थ्यांना वही, पेन, पट्टी अशा शैक्षणिक व विद्यार्थी उपयोगी वस्तूंचे वाटप केले. प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक अनिल काळे यांनी रावसाहेब जाधवर यांचा शाळेच्यावतीने सत्कार केला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल काळे, रामचंद्र बरचे, आनंद घाडगे, हरिभाऊ दळवी, श्रीमती वैशाली खुने, श्रीमती बेबीनंदा खडबडे, श्रीमती सुवर्णगौरी शिंदे, श्रीमती मीरा गरड, दिपाली गोरे उपस्थित होते.