सोलापूर : समर्थ सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत संचालक म्हणून निवडून येणे हा आमचा उद्देश नसून, अडचणीत सापडलेली समर्थ बँक पुन्हा सक्षमपणे सुरू करून तिला गतवैभव मिळवून देणे हा मुख्य हेतू आहे. बँकेच्या सद्यस्थितीचा सर्वंकष अभ्यास करून गुंतवणूकदार, सभासद आणि तज्ज्ञांच्या मदतीने येत्या सहा महिन्यांत बँकेच्या पुनरुज्जीवनाचा रोडमॅप तयार केला जाईल, अशी भूमिका सहकार परिवार पॅनलचे प्रमुख राम तडवळकर व राकेश टोळये यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
समर्थ सहकारी बँकेच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने सहकार परिवार पॅनलचे प्रमुख राम तडवळकर , राकेश टोळये , डॉ. पी. टी. कुलकर्णी आणि केतन वोरा यांनी पॅनलची भूमिका स्पष्ट केली. सहकार परिवार पॅनलचे एकूण १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यापैकी महानंद कांबळे, रवींद्र गारुडकर आणि प्रकाश बंडगर हे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पॅनलला ‘कप-बशी’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. रविवार दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
राकेश टोळये म्हणाले, समर्थ बँकेवर सोलापूरकरांचा मोठा विश्वास होता. सुमारे दीड लाख खातेदार, साडेचार हजार सभासद आणि सुमारे ३०० कर्मचारी, तसेच महाराष्ट्रातील ३३ शाखांच्या माध्यमातून बँकेने मोठी मजल मारली होती. समर्थ बँकेचा कर्मचारीवर्गही गुणवत्तेसाठी ओळखला जात होता. मात्र, काही अडचणींमुळे बँकेची परिस्थिती बदलली. अनेक खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळाले असून, अद्यापही काही रक्कम देणे बाकी आहे. प्रत्येक खातेदाराचा पैसा सुरक्षित राहावा आणि बँकेवरील विश्वास पुन्हा निर्माण व्हावा, यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
राम तडवळकर यांनी सांगितले की, पॅनलमध्ये एकही माजी संचालक घेण्यात आलेला नाही. जुन्या आरोप-प्रत्यारोपांत न अडकता बँक पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने सकारात्मक प्रयत्न केले जातील. थकीत कर्जवसुली, बँकेची आर्थिक स्थिती, कर्मचारी, ठेवीदार आणि संभाव्य गुंतवणूकदारांचे प्रश्न तसेच रिझर्व्ह बँकेचे नियम यांचा सखोल अभ्यास करून पुढील दिशा निश्चित केली जाईल.
निवडणुकीनंतर लगेच बँक सुरू होणार नसून उपलब्ध कागदपत्रे, आर्थिक स्थिती आणि नियामक नियमांचा अभ्यास करून सहा महिन्यांत ठोस कृती आराखडा तयार केला जाईल. या कालावधीत सोलापूर शहरातील सुमारे १ हजार ते १ हजार ५०० सभासदांशी संपर्क साधून त्यांच्या भावना जाणून घेण्याचा आणि विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
बँकेचे माजी संचालक, कर्मचारी, सभासद, गुंतवणूकदार आणि नागरिकांनी कोणतेही मतभेद बाजूला ठेवून समर्थ बँक पुन्हा सक्षमपणे उभी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही पॅनलच्या वतीने करण्यात आले. या पत्रकार परिषदेस पॅनलचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
नियोजनपूर्वक कृती आराखडा
तयार करण्यात येणार
बँक पुन्हा सुरू करण्यासाठी काय नियोजन आहे या प्रश्नाच्या उत्तरात तडवळकर म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन बँक सुरू करण्याचा प्रयत्न आहे. गुंतवणूकदारांशी चर्चा करून नियोजनपूर्वक कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. बँक पुन्हा सुरू करणे हाच प्राधान्याचा विषय राहणार आहे. यापूर्वी कुठे चुका झाल्या याचा अभ्यास करून वसुलीवर लक्ष केंद्रित करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
सहकार परिवार पॅनलचे हे आहेत उमेदवार
सहकार पॅनेल प्रमुख – राम तडवळकर, राकेश टोळये ,
पी. टी. कुलकर्णी, केतन वोरा , उमेदवार असे – करकमकर किरण तुकाराम, बागेवाडीकर प्रशांत नरसिंह,
कामतकर अमित बाळकृष्ण, दुलंगे दिलीप शिवमूर्ती,
खाडीलकर मुरलीधर श्रीकृष्ण, माने युवराज लक्ष्मण,
सिंग ओम प्रकाश सूर्यबौक्ष, सिंग दिव्यांशु राजेंद्र बहाद्दर,
सिंग राहुल ओमप्रकाश, चौधरी स्वरूप दिलीप,
इनामदार सुजाता प्रकाश, सिंग मालती अमर बहाद्दर
तर बिनविरोध उमेदवार – बंडगर प्रकाश भिकाजी ( विमुक्त जमाती / भटक्या जाती / विशेष मागासवर्ग प्रवर्ग प्रतिनिधी), कांबळे महानंद बापू (अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी), गारुडकर रवींद्र बबन ( इतर मागासवर्गीय प्रतिनिधी).
—-
Post Views: 27