सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत पुरुष गटातील सलामीच्या सामन्यात वसुंधरा महाविद्यालयाने लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालयाचा २०-१५ असा ५ गुणांनी पराभव केला. महिला गटात वडाळ्याच्या माऊली महाविद्यालयाने एन.बी. नवले सिंहगड महाविद्यालयावर ३३-२२ अशी मात केली.
देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालयाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत ३० महाविद्यालयांतील १९ महिला व २२ पुरुष संघांनी भाग घेतला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सोनी महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन मधुसुदन करवा, सेक्रेटरी सुनिल माहेश्वरी,
सोलापूर विद्यापीठ क्रीडा परिषदेचे सचिव प्रा. संतोष गवळी, सिनेट मेंबर अजितकुमार संगवे, सोलापूर जिल्हा कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष मरगु जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उपस्थितांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा रोकडे, उपप्राचार्य प्रा. हरदिप कौर बोमरा, क्रीडा संचालिका प्रा. सुवर्णा कांबळे यांनी केले.
—-























