पंढरपूर – पंढरपूर शहरातील मध्यवर्ती भागात होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांना होणारा त्रास याबाबत दैनिक सोलापूर तरुण भारत मधून सातत्याने बातम्या प्रसिध्द करुन शहरातील वाहतूक कोंडी विषयीची गंभिरता प्रशासना समोर मांडली होती. अखेर पालिका प्रशासनाकडून या बातम्यांची दखल घेत शहरातील प्रमुख रस्त्यांवर सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.
पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी याबाबत पत्रक काढले असून संबंधित व्यापाऱ्यांना अवजड वाहतूक न करण्याच्या नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. बंदीच्या कालावधीत संबंधित परिसरात अवजड वाहन आणून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्यास वाहनधारक तसेच संबंधित व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नगरपालिकेने दिला आहे.
———————
चौकट : ( या मार्गावर आवजड वाहनांना असणार बंदी )
पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, अर्बन बँक परिसर, नवी पेठ, जुनी पेठ आणि स्टेशन रोड या प्रमुख वर्दळीच्या भागात सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत अवजड वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या परिसरातील व्यापाऱ्यांनी मालाची वाहतूक करताना प्रशारानाने निश्चित केलेल्या वेळेचे पालन करावे. सकाळी ९ ते रात्री १० या कालावधीत कोणतेही अवजड वाहन शहरातील या मार्गावर आणून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये, अशा सूचना नगरपालिकेने संबंधित व्यापाऱ्यांना दिल्या आहेत.
——————-
चौकट : ( नियम मोडल्यास उगारला जाणार कारवाईचा बडगा)
नगरपालिकेने दिलेल्या नोटीसां मध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारक आणि व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तसेच अवजड वाहनधारकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन देखील पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
——————-
चौकट : ( प्रभावी अंमलबजावणीकडे लागले लक्ष)
नगरपालिकेने अवजड वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असला तरी या नियमांची प्रत्यक्षात किती प्रभावी अंमलबजावणी होते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः सकाळी ९ ते रात्री १० या कालावधीत अवजड वाहनांना शहरातील प्रतिबंधित मार्गावर प्रवेश होऊ नये, यासाठी नगरपालिका आणि संबंधित प्रशासनाने नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.
दरम्यान दैनिक सोलापूर तरुण भारत मधून वारंवार उपस्थित केलेल्या शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येची अखेर पालिका प्रशासनाकडून दखल घेतली गेल्याने शहरातील बाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्याची अपेक्षा पंढरपूर नागरिकांमधून आता व्यक्त होत आहे.
Post Views: 14