मोहोळ : मराठी रंगभूमी आणि कला क्षेत्रातील आपल्या प्रभावी अभिनयाने रसिकांच्या मनावर अमीट ठसा उमटविणाऱ्या नाना पाटेकर यांना मोहोळ शहरातून रंगभूमी प्रतिष्ठानच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या कारकिर्दीला उजाळा देत त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. सिनेअभिनेते अमोल महामुनी, कलाकार राजन घाडगे, दिपक महिंद्रकर, अमोल काळे, राकेश डोंगरे, राजेंद्र वाकळे, बबन काकडे, जयराम टेकाळे, संतोष फाटे, रामभाऊ शेळके, लक्ष्मण गावडे, सत्यवान जाधव, सुमित खंदारे यांच्यासह उपस्थित कलाकारांनी नाना पाटेकर यांच्या स्मृतींना पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
नाना पाटेकर यांच्या अभिनयातील सहजता, संवेदनशीलता आणि सामाजिक जाणिवेचा ठसा मराठी कलाक्षेत्रावर कायम राहणार आहे. त्यांच्या निधनाने कला आणि रंगभूमी क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या कार्याची प्रेरणा भावी पिढ्यांना सदैव मार्गदर्शक ठरेल, अशी भावना यावेळी कलाकारांनी व्यक्त केली.
“नाना पाटेकर हे केवळ अभिनेते नव्हते, तर आपल्या अभिनयातून माणूस पणाची जाणीव जागवणारे संवेदनशील कलाकार होते. त्यांच्या कला आणि विचारांचा वारसा सदैव जिवंत राहील,” अशा भावपूर्ण शब्दांत अमोल महामुनी, राजन घाडगे, राजेंद्र वाकळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Post Views: 27