बार्शी – महाळाच्या विधीसाठी कुटुंबीय घराबाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरफोडी केली. या घटनेत सुमारे ६५.५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ९० हजार रुपये रोख, असा ऐवज चोरीस गेल्याची घटना मंगळवार रोजी दुपारी उघडकीस आली. बार्शी शहरातील बसवेश्वर कॉलनी, वाणी प्लॉट, आगळगाव रोड परिसरात ही घटना घडली.
याप्रकरणी मंगेश मारुती भडंगे (वय ३३, रा. बसवेश्वर कॉलनी, वाणी प्लॉट, आगळगाव रोड, बार्शी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
फिर्यादीच्या माहितीनुसार, भडंगे हे विमा एजंट म्हणून व्यवसाय करतात. दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता ते आई-वडिलांसह मूळ गावी तेरखेडा येथे महाळाच्या नैवेद्य विधीसाठी गेले होते. घराचा मुख्य दरवाजा तसेच मेन गेट व्यवस्थित कुलूप लावून बंद करण्यात आले होते. त्याच दिवशी दुपारी ३.४० वाजता ते कुटुंबीयांसह घरी परतले. यावेळी मेन गेट उघडून घरात प्रवेश केला असता घराचा दरवाजा पुढे केलेल्या अवस्थेत आणि त्याचे लॉक तुटलेले दिसले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. उजव्या बाजूच्या बेडरुममधील लोखंडी व फर्निचरच्या कपाटाचे लॉक तसेच तिजोरी फोडण्यात आल्याचे आढळले. घराची पाहणी करुन दागिने व रोख रक्कम तपासली असता ४८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १० ग्रॅमचे मणी मंगळसूत्र, प्रत्येकी सोन्याच्या तीन अंगठ्या मिळून ५ ग्रॅम सोने, २.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले फुले आणि ९० हजार रुपये रोख चोरीस गेल्याचे समोर आले. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.