सोलापूर – वन्यजीव सप्ताहानिमित्त बृहन्मठ होटगी संचलित एस. व्ही. सी. एस. हायस्कूल भवानी पेठ यांच्या वतीने स्काऊट-गाईडच्या ६० विद्यार्थ्यांसाठी मियावाकी वनभेटीचा शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आला.
या वेळी प्रवीण तळे यांनी मियावाकी ही जपानमध्ये विकसित झालेली वननिर्मितीची पद्धत असून, स्थानिक वृक्षप्रजातींची निवड करून कमी जागेत दाट स्वरूपाचे वन विकसित करण्याची तिची संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. मियावाकी वनाची रचना, झाडांची निवड, लागवडीची पद्धत, झाडांची वाढ आणि अशा वनांमुळे जैवविविधतेला मिळणारा आधार याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
संजय पोळ यांनी मियावाकी वनाचे प्रत्यक्ष स्ट्रक्चर, नियोजन व डिझाइन विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. झाडांची मांडणी, विविध स्तरांवरील वनस्पतींची निवड आणि उपलब्ध जागेचा योग्य वापर करून वनरचना कशी विकसित केली जाते, याची त्यांनी प्रत्यक्ष परिसर दाखवत माहिती दिली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तुषार राठोड यांनी वन्यजीव सप्ताहाची भूमिका स्पष्ट करताना जैवविविधतेचे महत्त्व, वनस्पती आणि वन्यजीव यांचा परस्परसंबंध तसेच पर्यावरण संवर्धनातील विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत थोडक्यात मार्गदर्शन केले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक राम ढाले उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी निसर्गाचे महत्त्व सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या उपक्रमांचीच आवश्यकता नसून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या दैनंदिन जीवनात निसर्गासाठी एखादी छोटी कृती सातत्याने केली, तरी त्यातून पर्यावरणपूरक जीवनशैलीची सुरुवात होऊ शकते, असा संदेश त्यांनी दिला.





















