बार्शी – सोलापूर जिल्ह्यासह बार्शी तालुक्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. शासनाने ‘ट्रिगर-१’च्या निकषानुसार दुष्काळी परिस्थितीची दखल घेतली असून, महसूल व कृषी विभागामार्फत खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. मात्र, पंचनामे केवळ खरीप पिकांपुरते मर्यादित न ठेवता सर्व प्रकारच्या फळबागा आणि फुलशेतीच्या नुकसानीचेही स्वतंत्र पंचनामे करावेत, अशी मागणी आमदार दिलीप सोपल यांनी केली आहे.
याबाबत आ. सोपल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांना पत्राद्वारे निवेदन दिले आहे. बार्शी तालुक्यात गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून पावसाने मोठी ओढ दिल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. परिणामी खरीप पिकांसह विविध फळपिकांच्या बागांवरही दुष्काळाचे गंभीर परिणाम जाणवत आहेत. फळबाग उभी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक वर्षे मेहनत आणि मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे पाण्याअभावी फळबागा नष्ट झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आणि दीर्घकालीन आर्थिक नुकसान होणार आहे.
फळबागा वाचविण्यासाठी अनेक शेतकरी विहिरी, बोअरवेलमधील उपलब्ध पाण्याचा वापर करीत असून, काही शेतकरी टँकरद्वारे पाणी आणून बागांना जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र उपलब्ध जलसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. त्याचबरोबर बार्शी तालुक्यातील अनेक भागांत फुलशेतीही केली जाते. फुलपिकांना नियमित पाण्याची आवश्यकता असल्याने पावसाअभावी या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे खरीप पिकांसोबत सर्व प्रकारच्या फळबागा व फुलशेतीचेही प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करण्याची गरज असल्याचे आ. सोपल यांनी पत्रात नमूद केले आहे.
Post Views: 12