पंढरपूर – तालुक्यातील मौजे तारापूर,मगरवाडी येथील सर्व्हे नं. १३७/२ मधील गट नं. २३० वरील पोटखराब क्षेत्र कमी करून तातडीने फार्मर आयडी देण्यात यावा, या मागणीसाठी संजय हणमंत वाघमारे यांच्यासह मागासवर्गीय शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. फार्मर आयडीअभावी शासनाच्या विविध योजना, कर्जमाफी तसेच दुष्काळी मदतीपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मागणीची तातडीने पूर्तता न झाल्यास १५ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
तारापूर येथील सर्व्हे नं. १३७/२, गट नं. २३० मधील जमीन शेतकरी वडिलोपार्जित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर क्षेत्र बागायती असून अनेक वर्षांपासून शेतकरी या जमिनीची वहिवाट करीत आहेत. यापूर्वी या जमिनीच्या आधारे शासकीय योजना तसेच बँक कर्जाचा लाभ मिळत होता. मात्र, सदर गटावरील पोटखराब क्षेत्र कमी झालेले नसल्यामुळे आता फार्मर आयडी तयार होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
फार्मर आयडी उपलब्ध नसल्याने शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये पात्रता असूनही लाभ मिळत नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. त्याचबरोबर सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शासनाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभही मिळत नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
आम्ही बागायती जमीन कसत असूनही केवळ पोटखराब क्षेत्राच्या नोंदीमुळे फार्मर आयडी मिळत नाही. त्यामुळे शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने तातडीने पोटखराब क्षेत्र कमी करून फार्मर आयडी उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या मागणीसाठी संजय हणमंत वाघमारे, अनिल भागवत वाघमारे, भैरु हरीबा रंदवे, शंकर जगन्नाथ वाघमारे, बाळासाहेब वसंत रंदवे, नागनाथ पांडुरंग वाघमारे, राजेंद्र हणमंत वाघमारे, ज्योतिराम हरी रंदवे, रतिलाल पोपट रंदवे, लिंगदेव आप्पाराव कांबळे, माधुरी दत्तात्रय चांदणे, केशर वसंत रंदवे, मथुरा हणमंत वाघमारे, सुंदर हरी रंदवे, प्रभाकर नागनाथ वाघमारे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार प्रणिती शिंदे, आमदार राजू खरे तसेच पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.