सोलापूर : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘डॉ. अब्दुल कलाम साहित्य संमेलन २०२६’ अंतर्गत शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि युवकांसाठी चार विधायक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून ३८० जणांना शेती, शिक्षण, स्वयंरोजगार आणि उद्योग क्षेत्रात मार्गदर्शन व मदतीची संधी मिळणार आहे. इच्छुकांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन मुख्य संयोजक काशिनाथ भतगुणकी यांनी केले.
ड्रीम फाउंडेशन, डॉ. कलाम कौशल्य विकास केंद्र, पुणे आणि चाणक्य गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान हे संमेलन होणार आहे. यामध्ये कमी पाण्यात फायदेशीर शेतीसाठी ९५ शेतकऱ्यांना हुरडा बियाणे देण्यात येणार आहे. ‘स्त्रीशक्ती, राष्ट्रशक्ती’ उपक्रमांतर्गत ९५ महिलांना सेंद्रिय भाजीपाला लागवड, उत्पादन, विपणन आणि ब्रँडिंगचे मार्गदर्शन मिळेल.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ९५ विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण, ग्रंथालय आणि अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा व शिका’ उपक्रमही राबविण्यात येईल. तसेच ९५ युवकांना स्वयंरोजगार व उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक नगरकर मार्गदर्शन करणार आहेत.
१५ व १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत सोरेगाव येथील श्री सिद्धेश्वर रिसॉर्ट येथे उपक्रम होतील. १७ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे निवडपत्रांचे वितरण होणार आहे. पात्र लाभार्थ्यांची निवडपूर्व मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
नावनोंदणीसाठी संगीता पाटील
८४८४९५२०२० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Post Views: 9