सोलापूर – महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील तरतुदींनुसार विद्यार्थी परिषद निवडणुका मुक्त, निर्भय, शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य शासनाने मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेढेकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या माध्यमातून महाविद्यालय व विद्यापीठातील सर्व घटकांचे अभिप्राय जाणून घेतले जात आहेत.
यामध्ये विद्यापीठातील व महाविद्यालयांतील प्राचार्य, प्राध्यापक, संचालक, प्रशासकीय अधिकारी, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, व्यवस्थापन प्रतिनिधी, पालक आणि विद्यार्थ्यांकडून विविध मुद्द्यांवर मते व सूचना १९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजेपर्यंत विद्यार्थी विकास विभागाच्या dsw@sus.ac.in या ई-मेल आयडीवर पाठवावेत, असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. महेश खरात यांनी काळविले आहे.
प्राप्त झालेल्या सर्व अभिप्रायांचे संकलन करून ते पुढील कार्यवाहीसाठी तात्काळ शासनास सादर केले जाणार आहेत.
अभिप्राय नोंदवण्यासाठी आठ प्रमुख मुद्दे:
निकोप वातावरण: विद्यार्थी परिषद निवडणुका पूर्णतः निकोप वातावरणात पार पडण्यासाठीच्या सूचना.
डिजिटल/ऑनलाईन प्रक्रिया: निवडणूक प्रक्रिया सुलभ व गतिमान करण्यासाठी डिजिटल किंवा ऑनलाईन पद्धत वापरण्याबाबतची मते.
राजकीय हस्तक्षेप: निवडणुकांमधील राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठीच्या उपाययोजना.
नामनिर्देशन: विद्यार्थी परिषदेवर नामनिर्देशन (Nomination) करण्याबाबतच्या सूचना.
प्रशासकीय सहभाग: निवडणूक प्रक्रियेत शासन, प्रशासन व प्रशासकीय घटकांचा सहभाग कसा असावा, याबद्दलचे मत.
विद्यार्थी विकास व कर्तव्ये: विद्यार्थी विकासासाठी परिषदेचा सहभाग वाढवणे आणि तिची कर्तव्ये व जबाबदाऱ्या ठरवणे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020): राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थी परिषदेचा सहभाग अधिक प्रभावी करणे.
नियमांचे उल्लंघन टाळणे: निवडणूक नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठीच्या उपाययोजना.
——




















