या वेळी शाळेत विद्यार्थिनींसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. काही मुलींनी महालक्ष्मी, दुर्गामाता, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा ऐतिहासिक व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची वेशभूषा साकारली. तर काही मुलींनी पोलीस, डॉक्टर यांसारख्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींची वेशभूषा केली. इतर मुली रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख परिधान करून सहभागी झाल्या होत्या. या वेशभूषांमुळे विद्यार्थिनींच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला चांगलाच वाव मिळाला .
यावेळी उपशिक्षिका मोहिनी कलढोणे यांनी भोंडला उत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट केले. तसेच भोंडल्यामध्ये हत्तीचे पूजन का केले जाते, यामागील परंपरा व सांस्कृतिक संदर्भ यांची माहिती उपस्थित महिला पालकांना दिली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या लोकपरंपरा, संस्कृती आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची ओळख होते, असेही या उपक्रमातून अधोरेखित झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिला पालकांना खिरापतीचे वाटप करण्यात आले. महिलांनी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक समीर लोणकर आणि उपशिक्षिका मोहिनी कलढोणे यांनी विशेष परिश्रम घेतले. पारंपरिक संस्कृतीचे जतन, विद्यार्थिनींच्या कलागुणांना प्रोत्साहन आणि शाळा-पालक यांच्यातील स्नेहसंबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा भोंडला उत्सव आनंददायी ठरला.



















