तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात सातव्या माळेनिमित्त शनिवारी (दि. १७) देवीची शेषशाही अलंकार महापूजा विधिवत मांडण्यात आली. या विशेष पूजेमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, देवीच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये उत्साह दिसून आला.
धार्मिक आख्यायिकेनुसार, भगवान विष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर विश्राम घेत असताना त्यांच्या कानातील मलापासून शुंभ आणि निशुंभ या दैत्यांची उत्पत्ती झाली. या दैत्यांनी भगवान विष्णूंवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ब्रह्मदेवांनी देवीची स्तुती करून तिला जागृत केले. देवीने शुंभ-निशुंभाचा संहार करून भगवान विष्णूंचे रक्षण केले. देवीच्या या पराक्रमाने प्रसन्न झालेल्या भगवान विष्णूंनी आपली शेषशय्या देवीला अर्पण केली, अशी धार्मिक मान्यता आहे. या आख्यायिकेच्या स्मरणार्थ शेषशाही अलंकार महापूजा मांडण्याची परंपरा आहे. या पूजेतून देवीचे सामर्थ्य आणि भक्तांच्या रक्षणासाठी सज्ज असलेले तिचे स्वरूप अधोरेखित होते.
यावेळी तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, तहसीलदार मृणाल जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, पोलीस निरीक्षक बालाजी येवते, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा यांच्यासह पुजारी, सेवेकरी आणि भाविक उपस्थित होते.
नवरात्रोत्सवातील सातव्या माळेच्या निमित्ताने झालेल्या शेषशाही अलंकार महापूजा आणि सिंह वाहनावरील छबिना मिरवणुकीतून श्री तुळजाभवानी मातेच्या समृद्ध धार्मिक परंपरेचे दर्शन घडले.
सिंह वाहनावरून छबिना मिरवणूक
दरम्यान, शुक्रवार (दि. १६) रात्री श्री तुळजाभवानी देवीची सिंह वाहनावरून छबिना मिरवणूक पार पडली. या पारंपरिक धार्मिक सोहळ्यात मंदिर प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, महंत, पुजारी, सेवेकरी आणि भाविक सहभागी झाले. त्यामुळे मंदिर परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.





















