अकलूज -( प्रतिनिधी ) विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासाठी केंद्र सरकार ईडी, सीबीआय व इतर संस्थांचा गैरवापर करत आहे. आपण सर्वजण रस्त्यावर उतरून संघर्ष केला, तरच हे सरकार ताळ्यावर येईल. आज देशभर सुरू असलेल्या आंदोलनांचा मुख्य उद्देश मतचोरी रोखणे हा आहे. मात्र, हे सरकार आंदोलने चिरडून टाकण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे या सरकारशी ताकदीने लढायचे असेल, तर आपले अधिकाधिक प्रतिनिधी निवडून आले पाहिजेत, असे मत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रचारार्थ २० ऑक्टोबर रोजी अकलूज येथे कृष्णप्रिया हॉलमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, शितलदेवी मोहिते पाटील, माजी आमदार रामहरी रुपनवर, शिवतेजसिंह मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील, प्रकाश पाटील, शंकरराव माने-देशमुख यांच्यासह पदवीधर व शिक्षक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तरुणांच्या प्रश्नांसाठी मतदानातून परिवर्तन घडवा – हर्षदा देशमुख-जाधव
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या की, देशातील महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर परीक्षेपूर्वीच फुटत आहेत. तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत, तर व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवलही उपलब्ध होत नाही. सरकार तरुणांना त्यांची बाजू मांडू देत नाही. देशातील परिस्थिती विचित्र झाली आहे. ही परिस्थिती बदलायची असेल, तर मतदानातूनच परिवर्तन घडवता येईल.
आपल्या विचारांचे लोकप्रतिनिधी सभागृहात पाठवायचे असतील, तर मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे. ग्रामीण भागात दर्जेदार शाळा उभ्या राहिल्या पाहिजेत. रोजगाराभिमुख शिक्षण मिळाले पाहिजे. प्रत्येक तालुक्यात रोजगार प्रशिक्षण केंद्र सुरू झाले पाहिजे. तसेच शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. या प्रश्नांना सभागृहात वाचा फोडण्यासाठी मला आपली प्रतिनिधी म्हणून निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शितलदेवी मोहिते पाटील आणि माजी आमदार रामहरी रुपनवर यांनीही मनोगत व्यक्त केले.
चौकट : ‘मोहिते पाटलांनी काय केले?’ या प्रश्नाला रुपनवर यांचे सडेतोड उत्तर
नातेपुते येथील सभेत मोहिते पाटील यांनी गेल्या सत्तर वर्षांत काय केले, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर भाष्य करताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, ज्यांना आम्ही एका रात्रीत आमदार केले, तेच आज मोहिते पाटील यांनी गेल्या सत्तर वर्षांत काय केले, असा प्रश्न विचारत आहेत. मोहिते पाटील यांनी काहीच केले नसते, तर लोकांनी त्यांच्या सांगण्यावरून तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिले असते का?
माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी त्याच सभेत मोहिते पाटील यांनी गेल्या सत्तर वर्षांत केलेल्या कामांचा ठणकावून उल्लेख करून या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिले. हा मुद्दा जागच्या जागी मांडल्याबद्दल मोहिते पाटील परिवार रामहरी रुपनवर यांचा आभारी आहे, असेही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.