सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील विकासकामांचे ठेके स्थानिक ठेकेदारांना मिळण्याऐवजी सातारा जिल्ह्यातील ठेकेदारांना दिले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी सोलापुरात केला. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून होणाऱ्या कामांच्या ठेक्यांवरून त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधत त्यांचा उल्लेख ‘करामती पालकमंत्री’ असा केला.
विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीसाठी रोहित पवार सोलापुरात आले होते. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. सोलापूर जिल्ह्यातील विकासकामांचे ठेके सातारा जिल्ह्यातील ठेकेदारांना दिले जात असल्याचा दावा करत त्यांनी स्थानिक ठेकेदारांना संधी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी पाणी, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांनी पार पाडावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र, इतर पक्षांतील नेत्यांना फोडणे आणि प्रत्येक विषयात राजकारण करणे, यातच पालकमंत्री धन्यता मानत असल्याची टीकाही त्यांनी केली.
पाणीपुरवठा, बससेवेवर चर्चा
विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात झालेल्या बैठकीत सोलापूर शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा आणि सिटी बससेवेचा अभाव या प्रश्नांवर चर्चा झाली. या चर्चेवरून निवडणुकीतील भाजपच्या दोन्ही उमेदवारांना मतदारांची पसंती नसल्याचे दिसून येते, असा दावा रोहित पवार यांनी केला.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, शहराध्यक्ष चेतन नरोटे आदी उपस्थित होते.
—
Post Views: 13