अकलूज – सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा, यासाठी सोलापूर ग्रामीण महासंघ जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे येथे पुरवठा उपआयुक्त श्री. तावरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी विविध समस्यांवर सुमारे दीड तास सविस्तर चर्चा झाली. दुकानदारांचे प्रलंबित मार्जिन सणापूर्वी जमा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश उपआयुक्तांनी दिल्याची माहिती संघटनेने दिली.
जुलै ते सप्टेंबर २०२६ या कालावधीतील धान्य वितरणाचे मार्जिन अद्याप मिळाले नसल्याचा मुद्दा संघटनेने उपस्थित केला. सणासुदीच्या काळात दुकानदारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ही रक्कम तातडीने मिळणे आवश्यक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. याची दखल घेत उपआयुक्त तावरे यांनी सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सोमवारपर्यंत मार्जिनसंदर्भातील आवश्यक माहिती तयार करून पाठविण्याचे निर्देश दिले. तसेच कोणत्याही परिस्थितीत सणापूर्वी सर्व दुकानदारांच्या खात्यावर मार्जिन जमा करावे; अन्यथा संबंधित कर्मचाऱ्याला नोटीस बजावण्यात येईल, अशी सूचना केल्याचे संघटनेने सांगितले.
शासनाच्या ‘मिशन सुधार’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची रेशनकार्डे चुकीच्या पद्धतीने बंद झाल्याचा प्रश्नही यावेळी मांडण्यात आला. कोणतेही उत्पन्न नसलेल्या, कुटुंबातील कोणीही नोकरीत नसलेल्या आणि आयकर न भरणाऱ्या कुटुंबांची रेशनकार्डे बंद झाल्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. अशा पात्र लाभार्थ्यांची रेशनकार्डे तातडीने पुन्हा सुरू करावीत, तसेच नियमांनुसार अपात्र ठरणाऱ्या कार्डांमुळे रिक्त होणारा धान्याचा इष्टांक संबंधित दुकानदारालाच देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२२ मध्ये चलनाद्वारे रोख भरणा केलेल्या दुकानदारांचा परतावा अद्याप प्रलंबित असल्याचा विषयही चर्चेत आला. काही तालुक्यांकडून आवश्यक माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे सादर करण्यात आलेली नसल्याने या प्रकरणाला विलंब होत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणले. संबंधित माहिती सादर करण्यास दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून दुकानदारांची प्रलंबित रक्कम तातडीने परत करावी, अशी मागणी संघटनेने केली.
दरम्यान, सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील जिल्हा व तालुका स्तरावरील संबंधित एसआयओ आणि एसआय अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेऊन धान्याचा इष्टांक आणि रोख भरण्याच्या प्रकरणांचा आढावा घेतला जाईल. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना उपआयुक्त कार्यालयाकडून सक्त सूचना देण्यात येतील, असे आश्वासन तावरे यांनी दिल्याची माहिती संघटनेने दिली.
या भेटीत दुकानदारांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपआयुक्तांचे आभार मानले. मात्र, मार्जिन, रेशनकार्ड, इष्टांक आणि रोख परताव्याबाबत दिलेल्या निर्देशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांचे लक्ष लागले आहे.
यावेळी सोलापूर ग्रामीण महासंघ जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय मंडलिक, पंढरपूर तालुका संघटनेचे उपाध्यक्ष महावीर वाकसे, माळशिरस तालुक्यातील धान्य दुकानदार सुरेश पांढरे, बाळासाहेब आवटे आणि मिलिंद रेडेकर उपस्थित होते.