अकलूज – कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत योगदान देणाऱ्या अक्काताई उत्तमराव माने-शेंडगे यांच्यासारख्या कर्तृत्ववान महिला घरोघरी असायला हव्यात, असे गौरवोद्गार पुरुषोत्तम खेडेकर यांनी काढले.
अकलूज येथील कृष्णप्रिया मल्टीपर्पज हॉल येथे अक्काताई उत्तमराव माने यांच्या एकसष्ठीनिमित्त आयोजित ‘अक्काताई : जीवनकार्याची सुवर्णगाथा’ या गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, मदनसिंह मोहिते पाटील, डॉ.एम.के.इनामदार, जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील, कल्याणराव काळे, प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, माजी प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे, माजी महासचिव विजयकुमार ठुबे, संजय देसाई, कल्याणराव भोसले, कांचनमाला मोहिते पाटील, स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, शितलदेवी मोहिते पाटील, वैष्णवीदेवी मोहिते पाटील, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, सभापती दत्तात्रय मगर, वनिता अरबट, वंदना घोगरे, सुजाता ठुबे, रामचंद्र सावंत पाटील, ॲड.प्रकाश पाटील, रवींद्र पाटील, यशराज जगदाळे, रावसाहेब पराडे पाटील, रावसाहेब देशमुख यांच्यासह मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडचे राज्यातील सर्व पदाधिकारी, डॉक्टर, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अक्काताईंनी मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले. कुटुंबाची जबाबदारी पार पाडतानाच पुरोगामी विचारांचा प्रसार आणि महिलांमध्ये वैचारिक जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार आचरणात आणत त्यांनी आपल्या कुटुंबात समता, विवेक आणि स्वाभिमानाची रुजवण केली. आपल्या मुलांचे विवाह शिवधर्म पद्धतीने करून त्यांनी पुरोगामी विचारांना कृतीची जोड दिली, असे पुरुषोत्तम खेडेकर यांनी नमूद केले.
गंगाधर बनबरे म्हणाले, मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासून चळवळीत सक्रिय सहभाग घेत त्यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक कार्याची व्याप्ती वाढवली. माणुसकीपूर्ण स्वभावाचा, आपलेपणाचा आणि सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
मदनसिंह मोहिते पाटील म्हणाले, अक्काताईंच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा, सामाजिक योगदानाचा आणि पुरोगामी विचारांच्या बांधिलकीचा परिचय पुढील पिढीला व्हावा, या उद्देशाने ‘अक्काताई : जीवनकार्याची सुवर्णगाथा’ या गौरवग्रंथाची निर्मिती करण्यात आली. वारकरी परंपरा आणि शिवधर्माच्या विचारांचा वारसा जपत त्यांनी आपल्या कुटुंबात विवेक, समता आणि स्वाभिमानाची रुजवण केली. सामाजिक कार्य करताना कुटुंबाकडे दुर्लक्ष न करता दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. मराठा आरक्षणाच्या चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेत तरुणांच्या शिक्षण, रोजगार आणि भविष्याच्या प्रश्नांवर संवेदनशील भूमिका घेतली. या गौरव ग्रंथाचे संपादन डॉ अमोल माने व अजित माने यांनी केले. जिजाऊ वंदना अजित माने यांनी केली तर शाहीर राजेंद्र कांबळे लिखित अक्काताई यांच्या जीवनावरील पोवाडा पुष्कराज माने, आर्वी माने व उर्वी माने यांनी गायला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इंद्रजीत घुले यांनी केले.
Post Views: 23