सोलापूर : सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी मातेचा सीमोल्लंघन पालखी सोहळा विजयादशमीनिमित्त मंगळवारी उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला. ‘आई राजा उदो… उदो’च्या जयघोषात निघालेल्या सवाद्य पालखी मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पारंपरिक पद्धतीने शमीपूजन आणि सीमोल्लंघन करून दसरा सण साजरा करण्यात आला.
विजयादशमीनिमित्त सकाळी श्री रूपाभवानी मातेची काकड आरती व अलंकार महापूजा करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी देवीची पालखी सीमोल्लंघनासाठी मंदिरातून बाहेर पडली. तुळजापूर वेसमार्गे पार्क चौकातून हुतात्मा पुतळ्याजवळील शमी वृक्षापर्यंत पालखी मिरवणूक वाजत-गाजत काढण्यात आली. या वेळी पारंपरिक वाद्यांच्या गजराने आणि देवीच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता.
या सोहळ्यासाठी मंदिराचे विश्वस्त, वहिवाटदार व
पुजारी मल्लिनाथ मसरे, सुनील मसरे, अनिल मसरे, श्री सिध्देश्वर बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले, राजशेखर हिरेहब्बू, सुधीर थोबडे, सोमनाथ मेंगाणे, संदेश भोगडे, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हुतात्मा पुतळ्याजवळील शमी वृक्षाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर वृक्षाला पाच प्रदक्षिणा घालून सीमोल्लंघनाची धार्मिक परंपरा पार पाडण्यात आली. त्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
शमीपूजनानंतर पालखी मिरवणूक मसरे गल्ली येथे पोहोचली. तेथे अंबिका देवीची आरती करण्यात आली. त्यानंतर भोगडे गल्ली येथील कसबा देवी (फिरकी अंबाबाई) मंदिरात जाऊन देवीची मनोभावे पूजा करण्यात आली. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. विविध धार्मिक विधी आणि आरतीनंतर पालखी पुन्हा श्री रूपाभवानी माता मंदिरात आणण्यात आली.
Post Views: 7