सोलापूर -मागील भांडणाच्या रागावरून एका रिक्षा चालकास चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना जोडबसवन्ना चौकात सोमवारी रात्री नऊ वाजता घडली. दरम्यान या खुनी हल्लाप्रकरणी दोघा मारेकरी तरुणा विरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताजोद्दीन चांदसाब शेख, मोहसीन लियाकत चौधरी(रा. राहुल गांधी झोपडपट्टी सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत खालिद आसिफ शेख( वय- ३३ वर्षे, रा.
८९, साखर पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
यातील फिर्यादी हे दि. १९ ऑक्टोबर रोजी रात्री ९.१५ वा चे सुमारास न्यु गोविंद मेडीकल जवळ, जोडबसवण्णा चौक, येथे रिक्षा भाडे मारण्यासाठी थांबलेले होते. सदर वेळी वरील आरोपी हे मागील भांडणाचा राग मनात धरुन बुलेट वाहनावरून त्या ठिकाणी आले. व फिर्यादीस तेरी औकात क्या हमारे साथ झगडे करनेकी, तुझे बहुत मस्ती आई, तुझे अब जिंदा रखता नही, तुझे खतम करता अशी धमकी देऊन आरोपी ताजुद्दीन याने कमरेला ठेवलेला चाकू काढून फिर्यादीच्या छातीमध्ये उजवे बाजुला भोसकला . हल्ल्यात चाकू जखमीच्या छातीमध्ये अडकला गेला. या खुनी हल्ल्यात फिर्यादी हा गंभीर जखमी झाल्याने त्याला मदतनीस शाहिद याने उपचाराकरिता येथील शासकीय रुग्णालयात चाकू सह रात्री दहा वाजता दाखल केले. त्यानंतर शस्त्रक्रिया करून छातीत अडकलेला चाकू काढण्यात आला होता.सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
चौकट – खुनी हल्ल्यातील मुख्य आरोपी जेरबंद – आज कोर्टात हजर करणार
दरम्यान या खुनी हल्ल्यानंतर पसार झालेला मुख्य आरोपी ताजोद्दीन शेख याला जेलरोड पोलिसांनी आज बुधवार रोजी सायंकाळी अटक केली आहे. तो ट्रक चालक असून त्याचा भाऊ हा रिक्षा चालक आहे. काही दिवसां पूर्वी आरोपीच्या भावाचे व यातील जखमीचे रिक्षात प्रवासी भरण्यावरून तक्रार झाली होती. या रागातूनच आरोपीने हा खुनी हल्ला केला. तर दुसरा आरोपी मोहसीन चौधरी हा अद्याप फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीला उद्या गुरुवारी दुपारी येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपासी अमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी दिली.